मागील पराभवाचे उट्टे काढण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:18 IST2017-08-10T23:03:46+5:302017-08-11T00:18:26+5:30
मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मागील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी काही तालुक्यांतील उमेदवारांनी कंबर कसल्याची चर्चा आहे. त्यातच यंदाची निवडणूक तुल्यबळ होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. प्रचाराचे शेवटचे दोन दिवस उरले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे.

मागील पराभवाचे उट्टे काढण्याची तयारी
नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मागील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी काही तालुक्यांतील उमेदवारांनी कंबर कसल्याची चर्चा आहे. त्यातच यंदाची निवडणूक तुल्यबळ होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. प्रचाराचे शेवटचे दोन दिवस उरले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे.
रविवारी (दि.१३) मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. एकूण दहा हजार १४७ मतदार असून, त्यात सर्वाधिक मतदार हे निफाड, बागलाण व नाशिक तालुक्यांतील आहेत. १४ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी संस्थेच्या घटनेप्रमाणे सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभाही आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे नवीन चेहºयांना संधी देण्याच्या कारणावरून सत्ताधारी प्रगती पॅनलने तब्बल सात विद्यमान संचालकांना उमेदवारी नाकारली आहे, तर या सात विद्यमान संचालकांना गळी लावण्यास विरोधी समाज विकास पॅनलला उमेदवारी देऊन तरी यश आलेले नाही. आता या सात संचालकांची भूमिका निर्णायक ठरू शकते. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे या निवडणुकीत एकाच वेळी अनेक व्याही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे यंंदाची निवडणूक प्रथमच नात्यागोत्यावर लढली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातच विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांच्या उमेदवारीवर सुरेश डोखळे यांनी आक्षेप घेत त्यांचा अर्ज बाद केल्याने सत्ताधाºयांना तो एक धक्का मानला गेला. यंदा प्रथमच पाच पदाधिकारी पदासह सर्व तालुक्यांच्या संचालकपदाची निवडणुकी चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. चांदवड, नांदगाव, दिंडोरी, मालेगाव, देवळा, बागलाण निफाड तालुक्यांतील लढती रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.