नाशिक : सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर शहराच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब होण्यास अवघे काही तास बाकी आहेत. पंचवीस वर्षांतील भाजपाचा प्रथमच स्वबळावरील विजयोत्सव साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. विशेषत: भाजपाचे अनेक नेते निवडीसाठी दाखल होणार असून, त्यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने प्रथमच आरोग्यासह मूलभूत सुविधांची घोषणा करतानाच पारदर्शक कारभाराची हमी देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाने १२२ पैकी ६६ जागा पटकावत बहुमत मिळवले आहे. आजवर शिवसेनेच्या लहान भावाची भूमिका घेणाऱ्या भाजपाला प्रथमच आता स्वबळावर स्वत:चा महापौर करता येणार आहे. विशेष म्हणजे नाशिकचे यंदाचे महापौरपद अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासींसाठी राखीव आहे. त्यावर भाजपाच्या उमेदवाराचे नाव कोरण्याची ऐतिहासिक संधी भाजपाला मिळाली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने महापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी, तर उपमहापौरपदासाठी प्रथमेश वसंत गीते यांना संधी देण्यात आली आहे. अशावेळी हा पहिलावहिला स्वबळावरील विजयोत्सवाचा सोहळा साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. मंगळवारी सकाळी भाजपाचे सर्व नगरसेवक पंचवटीतील स्वामी नारायण मंगल कार्यालय येथे जमतील आणि पक्षाच्या ध्वजाला अनुकूल भगवे रंगाचे पोशाख परिधान केलेले हे सर्व नगरसेवक खास बसने महापौर निवासस्थान असलेल्या रामायण येथे पोहोचतील. तेथील पूर्व दरवाजाने ते पालिकेत प्रवेश करतील. महापौरपदाची निवडणूक प्रथम होणार असून, जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. त्यामुळे अर्ज माघारीसाठी दिलेल्या विहित कालावधीनंतर हात उंचावून मतदान घेतले जाणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भाजपाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन, संघटन मंत्री रवि भुसारी, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री किशोर काळकर यांच्याबरोबरच अन्य काही प्रदेश नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विशेषत: प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विजयोेत्सव संस्मरणीय करण्याची तयारी
By admin | Updated: March 12, 2017 20:25 IST