टँकरच्या पाण्यावर खरिपाची तयारी
By Admin | Updated: June 8, 2016 00:37 IST2016-06-07T23:40:53+5:302016-06-08T00:37:14+5:30
नायगाव खोरे : भीषण पाणीटंचाईवर शेतकऱ्यांकडून उपाय; पावसाकडे नजर

टँकरच्या पाण्यावर खरिपाची तयारी
दत्ता दिघोळे नायगाव
सतत पडणाऱ्या अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असताना कोणत्याही परिस्थितीत खरीप हंगाम उभा करण्यासाठी शेतकरी तयारीला लागल्याचे
चित्र सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात दिसत आहे.
नायगाव खोऱ्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून सतत पावसाचे प्रमाण कमी कमी होत आहे. चालू वर्षी तर हे प्रमाण खूपच कमी झाल्याने परिसरातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर घटली. पर्यायाने खरिपापाठोपाठ रब्बीचे पीक जेमतेमच हाती आले. त्यातही बाजारात मिळालेल्या मातीमोल भावामुळे शेतकरीवर्गाला उत्पादन खर्चातही तोटा सहन करावा
लागला.
पर्यायाने डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होण्याऐवजी त्याचा भार अधिक वाढल्याने शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला. चालू वर्षी सर्वत्रच पावसाचे प्रमाण खूपच कमी झाल्याने परिसरातील पाणी पातळी खोलवर गेल्याने सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे शेतीला तर नाहीच पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करण्याची वेळ आली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी नर्सरीमध्येच रोपांची बुकिंग केली आहे. तथापि, बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांनी पाऊस पडेपर्यंत थांबणेच पसंत केले आहे. गेल्या १५ दिवसांपासून वातावरणात हवेचा गारवा वाढण्याबरोबर जोरदार वाऱ्याचे आगमन झाल्याने पावसाच्या अंदाजाबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
सततच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित दिवसेंदिवस बिघडत आहे. अशा अनेक गोष्टींवर मात करत शेतकरी आपली गुजराण करत आहे.
बिकट परिस्थितीला तोंड देताना हताश झालेला शेतकरी पावसाच्या भरवशावर व कमी खर्चाचे बाजरी, सोयाबीन, भुईमूग ही पिके घेताना दिसत आहे.
सध्या खरिपाच्या पिकांसाठी लागणाऱ्या रोपांना विकतचे पाणी देणे किती परवडणारे व यशस्वी होते हे आगामी काळातील वेळेवर पडणाऱ्या पावसाच्या भरवशावरच सर्व अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.