गडावर नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: September 27, 2016 22:45 IST2016-09-27T22:37:27+5:302016-09-27T22:45:12+5:30
योजना : या वर्षापासून भाविकांसाठी जनसुरक्षा विमा

गडावर नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
प्रवीण दोशी वणी
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असणाऱ्या सप्तशृंगगडावर नवरात्री, दसरा व कोजागरी पौर्णिमा या उत्सवांच्या यशस्वीतेसाठी गड प्रशासन सज्ज झाले आहे.
दोन दिवसांवर येऊन ठेपलेला शारदीय नवरात्रोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. दि. १ ते १७ आॅक्टोबर या कालावधीत साजरा होणाऱ्या उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दि. १ आॅक्टोबर रोजी श्री भगवतीची पंचामृत महापूजा व घटस्थापना करण्यात येईल. दि. २ ते ४ श्री भगवती पंचामृत महापूजा, दि. ६- ललिता पंचमी, दि. ७- षष्ठी, दि. ८- सप्तमी, दि. ९- दुर्गाष्टमी, दि. १०- महानवमी शतचंडी याग व होमहवन, दि. ११ आॅक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त शतचंडी याग, पूर्णाहुती पूजा होणार आहे, तर दि. १५ रोजी कावडधारकांनी आणलेल्या तीर्थाचा देवीला अभिषेक, पूजन व आरती व दि. १६ आॅक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेला शांतिपाठ, महापूजा प्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.
सकाळी प्रतिदिन ७ वाजता घटस्थापना, सकाळी १० वाजता नवमी शिखर ध्वजारोहण, कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ९ वा. ५३ मिनिट शांतिपाठ, रात्री साडेसात वाजता प्रसाद वाटपाने या उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. मंदिर प्रशासन समिती न्यास, ग्रामपालिका विविध प्रशासकीय घटक उत्सवासाठी सज्ज झाले आहेत. व यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर चोवीस तास खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंदिरापासून परशुराम बालाकडे जाणारा प्रदक्षिणा मार्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये बंद ठेवण्यात आला आहे.मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार व चढत्या-उतरत्या पायऱ्यांदरम्यान विविध ठिकाणी उद्बोधन कक्ष, ध्वनिक्षेपक, क्लोज सर्किट टीव्हीसह मंदिराच्या पहिल्या पायरीवर नारळ फोडण्यासाठी पाच मशिन्स ठेवण्यात आल्या आहेत. कर्पूर कुंड व अगरबत्ती अर्पण व्यवस्था पहिल्या पायरीजवळील श्री गणेश मंदिराजवळ करण्यात आली आहे. ४ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, सुरक्षा विभाग कर्मचाऱ्यांकडे विविध ठिकाणी १२ हॅण्डमेटल डिटेक्टर, दर्शन रांगा व भाविकांच्या गर्दीवर नियंत्रणासाठी पाइप रेलिंग, भाविकांना सुलभतेसाठी १५ ठिकाणी बाऱ्या लावण्यात येणार आहेत. यासाठी ९० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
४सभामंडप परिसरात २२ सुरक्षारक्षक व ४ बंदूकधारी सुरक्षारक्षक, पूजा साहित्य घेण्यासाठी सेवेकरी, मंदिर प्रवेशद्वार ते मंदिर गाभारा तसेच सर्व ठिकाणी कायमस्वरूपी प्रकाशव्यवस्था, वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश मंदिर, श्रीराम टप्पा (श्रीराम मंदिर), गोलाई टप्पा (उतरती पायरी), भक्तांगण परिसर, धर्मदाय दवाखाना, रोप-वे इमारत, महामंडळ बसस्थानक, दत्त मंदिर चौक, मुंबादेवी मंदिर व शिवालय तलाव आदि ठिकाणी भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येकी दोन हजार लिटर क्षमतेच्या दहा टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. भक्तनिवास परिसरात पाच लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ, आठ ठिकाणी वॉटर कुलर, तीन हातपंप, दोन पाणपोया तसेच न्यास व पतसंस्थेच्या माध्यमातून ठिकठिकाणी पाणी वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे.