चास येथे काशाई देवी यात्रेची तयारी पूर्ण
By Admin | Updated: February 6, 2016 22:43 IST2016-02-06T22:39:20+5:302016-02-06T22:43:19+5:30
चास येथे काशाई देवी यात्रेची तयारी पूर्ण

चास येथे काशाई देवी यात्रेची तयारी पूर्ण
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथील काशाई देवी यात्रोत्सवास सोमवारपासून (दि. ८) सुरुवात होत आहे. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, दोन दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
भोजापूर परिसरातील नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी व चास आदि भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहत असल्याने चास येथील काशाई देवी यात्रा परिसरात सर्वात मोठी यात्रा असते. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काशाई देवी मंदिरास रंगरंगोटी करण्यात आली असून, परिसरात ग्रामस्वच्छता करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात व कलशावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यात्रा समिती व ग्रामपंचायत यांच्या वतीने यात्रोत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
पौष अमावास्येच्या दिवशी सोमवारी यात्रेस प्रारंभ होत आहे. सकाळी ८ वाजता काशाई देवीस मंगलस्नान घातल्यानंतर अभिषेक केला जाईल नंतर देवीस हिरवा चुडा चढविल्यानंतर होम-हवन झाल्यानंतर आरती केली जाईल. सायंकाळी ६ वाजता देवीच्या मुखवट्याची व काठ्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत गावातील अबाल वृद्धांसह महिलावर्ग व तरुण सहभागी होणार आहेत. रात्री ८ वाजता आतषबाजी व शोभेची दारू उडविण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे यांचा लोकनृत्य तमाश्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. ९) देवी मंदिरासमोर सकाळी ९ वाजता हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. नवसपूर्तीसाठी परिसरातील भाविकांकडून गळ खेळणे, लोटांगण घेणे आदिंसह प्रकार केले जातात. जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची नेहमी गर्दी असते. दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे. यात नाशिक व नगर जिल्ह्यातून नामवंत पहिलवान सहभागी होणार आहेत. विजेत्या मल्लांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. रात्री ९ वाजता मंगला बनसोडे यांच्या लोकनृत्याचा तमाशा होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात खेळणी, मिठाई, कटलली, रहाट पाळण्यांसह विविध दुकाने थाटण्यास प्रारंभ झाला आहे. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी यात्रा समितीचे जगन पाटील भाबड, बंडूनाना भाबड, जगन्नाथ खैरनार, अशोक खैरनार, सरपंच चंद्रशेखर खैरनार, बबन खैरनार, अशोक भाबड, शिवाजी खैरनार, दिगंबर खैरनार, गोविंद भाबड, विलास खैरनार, कचरु खैरनार आदिंसह ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)