निऱ्हाळेकरांवर ‘प्रीती’ कायमप्रीती

By Admin | Updated: April 24, 2016 23:18 IST2016-04-24T23:04:55+5:302016-04-24T23:18:17+5:30

झिंटा : सलग दुसऱ्या वर्षीही केला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

'Preeti' Parmri Pratiti on Nirbhalekar | निऱ्हाळेकरांवर ‘प्रीती’ कायमप्रीती

निऱ्हाळेकरांवर ‘प्रीती’ कायमप्रीती

निऱ्हाळे : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री, चित्रपट निर्माती, आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची सहमालकीण अशा अनेक आघाड्यांवर नाव कमावलेल्या प्रीती झिंटा यांनी दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळेकरांवरील आपली ‘प्रीती’ यंदाही कायम ठेवली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी झिंटा यांनी निऱ्हाळेकरांना दररोज एक टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
गत पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या निऱ्हाळे परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिसरातील सर्व जलस्रोत कोरडे पडले असून, शासनाकडून दररोज तीन टॅँकरद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात आहे. तथापि, निऱ्हाळे-फत्तेपूर ही दोन गावे व परिसरातील दहा वस्त्या यांना हे टॅँकर अपुरे पडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन सरपंच प्रकाश दराडे यांनी संतोष दराडे यांच्यामार्फत सिनेअभिनेत्री प्रीती झिंटा यांना पाणीटंचाईबाबत पत्र लिहिले होते. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी दराडे यांनी पत्रात केली होती. त्याची दखल घेऊन तातडीने झिंटा यांनी निऱ्हाळेकरांसाठी टॅँकरची दररोज एक खेप सुरू केली आहे. या टॅँकरद्वारे निऱ्हाळेतील काजीपुरा, लोहारवाडा, राजवाडा, कोळीवस्ती, इंदिरा आवास कॉलनी आदिंबरोबर वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
निऱ्हाळेकरांवर आपली ‘प्रीती’ कायम ठेवत पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा हातभार लावल्याबद्दल अभिनेत्री प्रीती झिंटा यांचे सरपंच प्रकाश दराडे, राजेंद्र वाघ, अण्णा काकड, गंगूबाई जाधव, योगेश सांगळे, सीताराम कटारनैरे, आशा काकड, सुनीता सांगळे, सविता सांगळे, शोभा शिंदे, दत्तू माळी, आर. एन. ठोंबरे यांच्यासह ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. (वार्ताहर)

Web Title: 'Preeti' Parmri Pratiti on Nirbhalekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.