पुरुषी, सत्तांध मनोवृत्तीवर भेदक भाष्य
By Admin | Updated: December 5, 2015 23:45 IST2015-12-05T23:44:44+5:302015-12-05T23:45:15+5:30
राज्य नाट्य : ‘पुरुष’ने स्पर्धेचा समारोप

पुरुषी, सत्तांध मनोवृत्तीवर भेदक भाष्य
नाशिक : जयवंत दळवी यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेल्या व पुरुषी मानसिकतेवर भेदक भाष्य करणाऱ्या ‘पुरुष’ या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेचा समारोप झाला. आकाश शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या वतीने हे नाटक सादर करण्यात आले.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आज हा प्रयोग रंगला. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक आपटे गुरुजी यांची मुलगी अंबिका ही स्वतंत्र विचारांची व राम मनोहर लोहिया यांच्या स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांवर विश्वास ठेवणारी शिक्षिका असते. सिद्धार्थ या दलित तरुणावर तिचे प्रेम असते. गुलाबराव जाधव हा सत्तांध, कामांध राजकीय नेता अंबिकेवर बलात्कार करतो. तेथून अंबिका व गुलाबराव यांच्यात संघर्ष सुरू होतो. सत्ता, पैशांपुढे न्यायव्यवस्था झुकून गुलाबरावची निर्दोष मुक्तता होते; मात्र अंबिका त्याचा सूड उगवतेच. अंबिका व गुलाबराव यांच्यातील संघर्षाचे तत्कालीन समाजव्यवस्थेच्या अनेक कंगोऱ्यांसह नाटकात चित्रण करण्यात आले.
जयवंत दळवी लिखित या नाटकाचे दिग्दर्शन प्रदीप (नाना) देवरे यांनी केले. गुलाबरावची भूमिकाही त्यांनीच केली. अश्विनी पाटील, अर्चना ब्राह्मणकर, अनुप शिंदे, वंदना कचरे यांनी अन्य भूमिका साकारल्या. नेपथ्य व प्रकाशयोजना बाळकृष्ण तिडके, संगीत अभिजित धारणे, संगीत संकलन रोहित सरोदे, रंगभूषा माणिक कानडे यांची होती.