नाशिक : शहर परिसरात सायंकाळच्या सुमारास सुमारे अर्धा तास मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ५.१ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली. दरम्यान, या पावसात गंगापूर रोडवर झाडांच्या फांद्या पडल्या; तर नाशिक रोड, सिडकोतील काही भागांत वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.
गेल्या तीन दिवसांपासून शहरातील अनेक भागांत पावसाचा शिडकावा होत असताना, शुक्रवारी सायंकाळी मात्र सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड ते दोन तास मध्यम तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू होता. दुपारनंतर ढग दाटून आले तसेच गार वारेही वाहू लागले होते. सायंकाळी साडेचार वाजल्यापासून पावसाचे वातावरण झाले तर वाऱ्याबराेबर हलक्या थेंबांनी पावसाला सुरुवात झाली. पाच वाजेनंतर पावसाने काही भागांत जोर धरला. शहरातील अनेक भागांत चांगलाच पाऊस झाला.
सकाळच्या सुमारास ऊन तर सायंकाळच्या सुमारास वाऱ्यासह पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सुमारे तासभर जोरदार पाऊस सुरू असल्याने शहराच्या अनेक भागांतील रस्त्यांवरून पाणी वाहत होते तसेच काही व्यावसायिक इमारतींभोवती पाणी साठले होते.