कोरोनाला रोखण्यासाठी प्राणायाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:28+5:302021-05-10T04:14:28+5:30

नाशिक : सध्या संपूर्ण देशाला कोविड-१९ आजाराने वेढले आहे. प्रत्येक नागरिक या आजाराबद्दल धास्तावला आहे. अशात आपल्या शरीराची ...

Pranayama to stop Corona! | कोरोनाला रोखण्यासाठी प्राणायाम !

कोरोनाला रोखण्यासाठी प्राणायाम !

नाशिक : सध्या संपूर्ण देशाला कोविड-१९ आजाराने वेढले आहे. प्रत्येक नागरिक या आजाराबद्दल धास्तावला आहे. अशात आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता आपणास स्वस्थ व निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचे कार्य करते. या रोगामध्ये प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. सध्या कोविड-१९ या रोगावर कुठलाही खात्रीशीर उपाय सापडलेला नाही. त्यामुळेच या रोगापासून वाचण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारा उपाय म्हणून प्राणायामाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

श्वास घेणे ही एक कला आहे. श्वास प्रक्रियेचं नियमन म्हणजे प्राणायाम. हे योगशास्त्राचं अत्यंत महत्वपूर्ण अंग आहे. त्यामुुळेच कोरोना रोखण्यासाठी प्राणायाम आणि जरी यदाकदाचित झालाच तर कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा सारं काही सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी प्राणायाम उपयुक्त ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जीवनातील विविध टप्प्यांवर योग आणि विशेषतः प्राणायाम अतिशय प्रभावी ठरू शकतो.

इन्फो

प्राणायामामुळे होणारे लाभ

कोरोनापासून बचावासाठी ज्येष्ठ नागरिक, मधुमेह आणि इतर श्वसन मार्गाचे आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष काळजी म्हणून तसेच लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना प्राणायामाचा मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकतो. प्राणायामाने आजाराची तीव्रता आणि थकवा इत्यादी शारीरिक परिणाम कमी करता येतात. या संक्रमणाशी लढण्यासाठी शरीरातील अंतर्गत सुरक्षा प्रणाली यामुळे कार्यान्वित होते. श्वसन संस्थेचे कार्य सुधारते आणि फुप्फुसांची क्षमता वाढते.

काळजी आणि सुरक्षितता

कोविड रुग्णांनी प्राणायाम सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे. या आजारात फुप्फुसांची क्षमता कमी होणे, श्वास घेण्यास अडचण, सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, थकवा, यासारखी अनेक लक्षणे असू शकतात. ताप असताना, श्वास घेताना त्रास होत असल्यास, छातीत धडधड, वेदना किंवा तातडीच्या उपचारांची गरज असणारी तीव्र स्वरुपाची लक्षणे असताना प्राणायाम करू नये. प्राणायाम करताना गरगरल्यासारखे वाटल्यास, खूप थकवा असल्यास किंवा श्वास भरून येत असल्यास लगेच थांबावे आणि विश्रांती घ्यावी.

कोविड रुग्णांसाठीचे प्राणायाम प्रकार

कोरोना संक्रमणातून बरे होताना प्राणायाम करताना श्वास घेताना चहाचा घोट घेतल्याप्रमाणे अंदाजे तीन सेकंद श्वास आत घ्या आणि हळूवारपणे सोडा. श्वास अगदी संथ, लयबद्ध घेणे आवश्यक असते. दुसरा प्रकार आहे उदरीय श्वसन. या प्रकारात श्वास घेताना आणि सोडताना पोटाचा भाग हळूहळू वरखाली होईल अशा पद्धतीने श्वसन करा. हे श्वसन कोणत्याही आरामदायक स्थितीत किंवा झोपूनही करता येते पण आधार न घेता जास्त वेळ पाठीवर झोपून राहिल्यास फुप्फुसांना इजा होऊ शकते. त्यामुळे पाठीला आधार देऊन टेकून बसलेल्या अवस्थेतच ते करावे.

भ्रामरी प्राणायामही उपयुक्त

हळूवार श्वास घेऊन तो सोडताना भ्रमरासारखे गुंजन करीत श्वास सोडा. यात निर्माण होणारी कंपने श्वसनसंस्थेला स्वच्छ करतात, विषाणू आणि जिवाणूंपासून संरक्षण करतात आणि फुप्फुसांची कार्यक्षमता वाढवतात. थकवा घालवण्यासाठी, ऊर्जा वाढवण्यासाठी, शांत झोपेसाठी आणि नकारात्मक विचार कमी करण्यासाठी भ्रामरी फार उपयोगी आहे. त्याशिवाय अनुलोम विलोमचाही फायदा होऊ शकतो. या प्राणायामामुळे शरीरातील प्राणऊर्जा वाहून नेणाऱ्या नाडींमधील ब्लॉकेजेस दूर होतात आणि प्राणशक्तीचा प्रवाह वाढतो. यामुळे चिंता, तणाव कमी होऊन मन शांत होते.

-----------------------

ही डमी आहे.

Web Title: Pranayama to stop Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.