नांदूरशिंगोटे परिसरातील पथदिव्यांची वीज खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:13 IST2021-09-13T04:13:47+5:302021-09-13T04:13:47+5:30
महावितरणने ग्रामपंचायतला अनेकदा कळवूनही वीज बिलाचा भरणा न केल्याने महावितरणने धाडसी कारवाई करीत जनतेला अंधारात आणले आहे. यापूर्वी पथदिव्यांचा ...

नांदूरशिंगोटे परिसरातील पथदिव्यांची वीज खंडित
महावितरणने ग्रामपंचायतला अनेकदा कळवूनही वीज बिलाचा भरणा न केल्याने महावितरणने धाडसी कारवाई करीत जनतेला अंधारात आणले आहे. यापूर्वी पथदिव्यांचा वीज भरणा शासनाच्यावतीने जिल्हा परिषदमार्फत केला जात होता. त्यामुळे ग्रामपंचायत बिनधास्त होती. परिसरातील सर्वच ग्रामपंचायत आर्थिक विवंचनेत असून शासन काहीतरी पर्याय देऊन महावितरणची थकबाकी फेडल्या जाईल, अशी आशा होती. मात्र शासनाने १५ व्या वित्त आयोगातून वीज बिलाचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटाने ग्रामपंचायतला अपेक्षित कर गोळा होत नाही. पाणी पुरवठा योजनेचे वीज बिल भरणे अवघड असतानाच पथदीपांचे देयके ग्रामपंचायतीच्या माथी आले आहेत. वीज बिलसारखा मोठा आकडा भरणे ग्रामपंचायतला निश्चितच आवाक्याबाहेरचा आहे. पथदीपांचे बिल कोणी भरावयाचे या वादात मात्र ग्रामस्थांना अंधारात रस्ता शोधण्याची वेळ आली आहे.
कोट....
नांदूरशिंगोटे उपकेंद्रातंर्गत येणाऱ्या नांदूरशिंगोटेसह, मानोरी, कणकोरी, चास, नळवाडी, कासारवाडी आदीसह वाड्या वस्त्यांवर असणाऱ्या १९ पथदीपांचे वीजपुरवठा खंडित केला आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना वीज बिल थकबाकी संदभात सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र वीज बिलाच्या रकमेची व्यवस्था न झाल्याने ग्रामपंचायतची वीज वरिष्ठांच्या आदेशाने खंडित केली.
- राहुल भगत, सहायक अभियंता, नांदूरशिंगोटे,
कोट....
गाव परिसरात असणाऱ्या पथदीपांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 15 व्या वित्त आयोगाचा आराखडा तयार करतांना वीज देयकांचा भरणा करण्याबाबत समावेश केलेला नाही. पथदीपांची थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामपंचायतींना तो भरणा करणे अवघड आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शासनाने पूर्वीप्रमाणे पथदिव्यांचे बिल भरण्याचे नियोजन करावे. ग्रामपंचायत आर्थिक अडचणीत असल्याने शासनाने पथदिव्यांच्या वीज बिलाची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे.
गोपाल शेळके, सरपंच, नांदूरशिंगोटे