पावणे सहा हजार शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:07+5:302021-05-05T04:24:07+5:30
सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली या ३३ केव्ही वीज उपकेंद्राला एकलहरे येथून भगूरमार्गे वीजपुरवठा होतो. तर इगतपुरी तालुक्यातील साकूर या ...

पावणे सहा हजार शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा
सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली या ३३ केव्ही वीज उपकेंद्राला एकलहरे येथून भगूरमार्गे वीजपुरवठा होतो. तर इगतपुरी तालुक्यातील साकूर या वीज उपकेंद्राला सातपूर येथून वीजपुरवठा होतो. १३२ केव्ही केंद्रावरून ही दोन्ही उपकेंद्रे सुमारे ४५ ते ५० किमी अंतरावर आहेत. साकूर येथील वाहिनी तर सुमारे ६० वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे वारंवार तारा तुटणे, अतिदाब तयार झाल्याने रोहित्र जळणे, या समस्या सतत सुरू राहत आहेत. त्यामुळे शेतीसाठी होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असतो. पांढुर्ली परिसरातील शेतकऱ्यांनी तर गेल्या पाच वर्षांत विजेचा प्रश्न सोडविण्याची वारंवार मागणी केली. या दोन्ही वीज उपकेंद्रांना एकलहरे व सातपूर येथून सुमारे ५० किमीवरून होणारा वीजपुरवठा हा व्यवहार्य नसून त्यात मोठ्या प्रमाणावर विजेची गळती होत असल्याचे आ. कोकाटे यांच्या लक्षात आले. काही महिन्यांपूर्वी आ. कोकाटे यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी खापराळे येथून १३२ केव्हीवरून या दोन्ही उपकेंद्रांना नवीन वीजवाहिनी टाकून वीजपुरवठा करण्याचा प्रस्ताव बनविण्याची सूचना केली. त्यामुळे ५० किमीचे अंतर १७ किमीवर येणार होते. त्यानुसार वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रस्ताव बनवला. त्यानुसार पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेत सुमारे २ कोटी ५० लाख रुपयांची योजना मंजूर झाली आहे. पुढील दीड महिन्यात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
इन्फो
या गावांना होणार वीजपुरवठा
काम पूर्ण होताच साकूर उपकेंद्रांतर्गत शेणीत, पिंपळगाव डुकरा, पिंपळगाव घाडगा, साकुर, कवडदरा, भरवीर खुर्द, भरवीर बु, धामणगाव, भंडारदरावडी, गंभीरवाडी व निनावी ही सुमारे ११ गावे व पांढुर्ली उपकेंद्रातील पांढुर्ली, विंचूरदळवी, वडगाव पिंगळा, आगासखिंड, बेलू, शिवडे, बोरखिंड व घोरवड ही ८ गावे अशा १९ गावांतील ५ हजार ८५० कृषिपंपधारक शेतकऱ्यांना हे काम पूर्ण होताच सुरळीत वीजपुरवठा मिळणार आहे. औद्योगिक कारणासाठी वीज वापरणाऱ्या ७८ ग्राहकांना फायदा होणार आहे. सुमारे ६ हजार घरगुती व वाणिज्य ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. एसएमबीटी रुग्णालयासही मोठा आधार मिळणार आहे.
कोट....
पांढुर्ली व साकूर वीज उपकेंद्रातील अनेक शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्येबाबत तक्रारी येत आहेत. ऊर्जा विभागाच्या विविध अधिकाऱ्यांना यावर मार्ग काढण्याचे सुचवले. सातपूर व एकलहरे येथून मतदार संघातील ३३ केव्हीच्या उपकेंद्रांना मिळणारा वीजपुरवठा हा सुमारे ५० किमी अंतरावरून होतो. त्यामुळे विजेची गळती मोठ्या प्रमाणावर होत आहे. नवीन वीजवाहिन्या मंजूर झाल्याने आता १७ किमीहून उपकेंद्रांना पुरेशा क्षमतेने वीजपुरवठा होईल.
- माणिकराव कोकाटे, आमदार
कोट...
नवीन वीजवाहिनीचे अंदाजपत्रक बनवून मंजुरीसाठी पाठविले आहे. पुढील दीड महिन्यात खापराळे येथून १३२ केव्ही वीज केंद्रातून पांढुर्ली व साकूर या उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यासाठी नवीन वीजवाहिनीचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- राजाराम डोंगरे, कार्यकारी अभियंता