प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शक्तिप्रदर्शन
By Admin | Updated: August 26, 2016 23:53 IST2016-08-26T23:53:04+5:302016-08-26T23:53:13+5:30
पोटनिवडणूक : राजकीय पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शक्तिप्रदर्शन
नाशिकरोड : जेलरोड प्रभाग ३५ व ३६ ची पोटनिवडणूक राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठेची करत गेल्या १५ दिवसांपासून उडालेला प्रचाराचा राजकीय धुराळा शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करत काढलेल्या प्रचार रॅलीने थंडावला.
जेलरोड प्रभाग ३५ व ३६ च्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने गेल्या १५ दिवसांपासून भाजपा, शिवसेना, मनसे, कॉँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षाची आघाडी यांनी प्रचाराचा चांगलाच धुराळा उडविला होता. शिवसेना, भाजपाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन शुक्रवारी दोन्ही प्रभागांतून संयुक्तरीत्या रॅली काढली होती. मनसेने प्रभाग ३६ मध्ये गुरुवारी सायंकाळी व प्रभाग ३५ मध्ये शुक्रवारी सकाळी रॅली काढली होती, तर राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीने प्रभाग ३५ मध्ये सकाळी व प्रभाग ३६ मध्ये दुपारी रॅली काढली होती. दोन्ही प्रभागातून चारही पक्षांच्या फिरणाऱ्या रॅली समोरासमोर व एकमेकांच्या प्रचार कार्यालयाकडून जाताना जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडत होते. चारही पक्षांच्या रॅली, लोकप्रतिनिधी, शहर-जिल्हा, स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीत ध्वनीक्षेपकांवर गाणे लावून देण्यात येणाऱ्या कर्कश्य घोषणा, कार्यकर्त्यांचा गोंगाट यामुळे परिसर दणाणून गेला होता. रॅलीमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले होते. शक्तिप्रदर्शन रॅलीने सांगता झाल्याने जेलरोडवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. (प्रतिनिधी)