अंतिम तारीख उलटून गेल्यावर वीजदेयकांचे वाटप
By Admin | Updated: May 19, 2017 00:59 IST2017-05-19T00:59:27+5:302017-05-19T00:59:48+5:30
मनस्ताप : दंडात्मक रकमेचा ग्राहकांना भुर्दंड

अंतिम तारीख उलटून गेल्यावर वीजदेयकांचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदिरानगर : परिसरात महावितरण कंपनीकडून वीजदेयकांची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतर वीजदेयकांचे वाटप संंबंधित ठेकेदाराकडून करण्यात आले. त्यामुळे दंडाच्या रकमेचा आर्थिक भुर्दंड नागरिकांना नाहक भरावा लागणार आहे. महावितरण कंपनीस दंडापोटी हजारो रुपयांचा महसूल वाढणार आणि नागरिकांना भुर्दंड होणार असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
इंदिरानगर परिसरात वीज ग्राहकांची संख्या हजारोच्या संख्येने आहे. महावितरण कंपनीकडून दर महिन्याला वीज मीटरचे छायाचित्राद्वारे वाचन आणि वीजदेयके एका खासगी संस्थेकडून करण्यात येते. आतापर्यंत अनेक वेळ वीजदेयकांना विलंब झाला आहे. परंतु संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याने उलटसुलट चर्चा होत आहे. मे महिन्यात गुरुवारी (दि.१२) वीजदेयके वाटप करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच वीज ग्राहकांना दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.तीव्र संताप इंदिरानगर परिसरात सुमारे ७० टक्के ज्येष्ठ नागरिक आहे. त्यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी आहे. त्यातच त्यांना मिळणारे पेन्शन गेल्या दोन महिन्यांपासून वेळेवर मिळत नाही. त्यात वीजदेयके अंतिम तारखेनंतर देण्यात आल्याने त्यांना दंडापोटी आर्थिक भुर्दंड भरावा लागणार त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत कारवाईची मागणी होत आहे.