दाभाडीच्या गडावर हिरे घराण्याचीच सत्ता
By Admin | Updated: September 3, 2014 00:20 IST2014-09-02T22:17:58+5:302014-09-03T00:20:58+5:30
राज्यभराचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि सतत मंत्रिपद भुषविणाऱ्या दाभाडी विधानसभा मतदारसंघावर १९७८ ते २००४ पर्यंत हिरे घराण्याचीच सत्ता होती;

दाभाडीच्या गडावर हिरे घराण्याचीच सत्ता
राज्यभराचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि सतत मंत्रिपद भुषविणाऱ्या दाभाडी विधानसभा मतदारसंघावर १९७८ ते २००४ पर्यंत हिरे घराण्याचीच सत्ता होती; फरक इतकाच की हिरे घराण्याशी राजकीय स्पर्धा करताना इतरांना निकराची झुंज द्यावी लागली असली तरी १९८५ पर्यंत डॉ. बळीराम हिरे व व्यंकटराव हिरे अशा दोन घरातच सत्तेसाठी राजकारण फिरत राहिले. त्यांना शिवसेनेचे अशोक हिरे यांनी मात्र तुल्यबळ लढत दिली होती.
मालेगाव तालुक्याचे ऐंशीच्या दशकात दोन विधानसभा क्षेत्र होती. मालेगाव व दाभाडी या नावाने परिचित. मालेगाव मुस्लिम बहुल वस्तीचे तर दाभाडी म्हणजे उर्वरित तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भाग होय. १९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसला पराभव पचवावा लागला. त्यानंतर जनता पक्षाचे सरकार आले. त्यावेळेस मोरारजी देसाई पंतप्रधानपदावर
आरुढ झाले होते. त्यांचे सरकार २५ महिने टिकले; त्याचाच परिपाक म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम झाला.
१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत दाभाडी मतदारसंघात राजकारण तापले होते. भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसतर्फे डॉ. बळीराम हिरे इच्छुक होते; परंतु त्र्यंबक रामजी पवार (टी. आर. पवार) हे शरद पवार यांच्या निकटचे मानले जायचे. त्यामुळे त्यांना भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे तिकीट मिळाले. ऐनवेळी डॉ. बळीराम हिरे यांना कॉँग्रेस (आय)च्या तिकिटावर लढावे लागले. तर माकपाने राजाराम निकम यांना मैदानात उतरविले होते. या निवडणूकीत चार उमेदवार रिंगणात होते. इंदिरा कॉँग्रेसचे डॉ. बळीराम हिरे ३२ हजार ९१८ मते मिळवून विजयी झाले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राजाराम दामोदर निकम यांना १ हजार ७९५, भाराकॉँचे टी. आर. पवार यांना ८ हजार ८८ तर जनता पक्षाचे उमेदवार शिवाजी नामदेव पाटील यांना २५ हजार ३६ मते मिळाली होती.
दाभाडीत भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे यांच्या अधिपत्याखाली राजकारण सुरू असल्याने कॉँग्रेसचा दबदबा होता. १९७८ च्या निवडणुकीत प्रचारासाठी इंदिरा गांधी आल्या होत्या. डॉ. हिरे विजयी झाल्यानंतर त्यांना शिक्षणमंत्रीपदाची लॉटरी लागली होती. तालुक्याचा विकास हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा होता. त्यावेळी डॉ. हिरे यांची मोठी विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर दोनच वर्षात पुन्हा झालेल्या निवडणुकीत पुन्हा हिरेंनी बाजी मारली आणि मतदारसंघावर साम्राज्य निर्माण केले.
१९८० च्या निवडणूकीत दोन हिरे सत्ता संपादनासाठी समोरासमोर आले होते. यात डॉ. बळीराम हिरे कॉँग्रेस (आय) तर व्यंकटराव हिरे कॉँग्रेस (अर्स) तर्फे उमेदवारी करीत होते. आपआपसामधील नातेसंबंधामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्यात दोघा उमेदवारांचे असंख्य नातेवाईक दाभाडीमध्येच असताना आणि विशेष म्हणजे दोघांची सासरवाडी देखील दाभाडी असल्याने याचीच सर्वत्र चर्चा रंगली होती. कोणाला मतदार कौल देतील याचा अंदाज बांधणे त्यावेळी अवघड होते. डॉ. हिरे यांना ३८ हजार ९०६ मते तर प्रतिस्पर्धी उमेदवार व्यंकटराव हिरे यांना ३० हजार ७८५ मते मिळाली. व्यंकटराव हिरे यांना ८ हजार १२१ मतांनी पराभव सहन करावा लागला.
नव्वदच्या दशकात कॉँग्रेसची राजकीय स्थिती अंतर्गत बंडाळीमुळे चांगली नव्हती. दाभाडी मतदारसंघात १९८५ च्या विधानसभा निवडणुकाही हिरे घराण्यातील जावाजावांमध्ये झालेल्या लढतींमुळे गाजल्या. या रणधुमाळीत तब्बल दहा उमेदवारांनी रंगत आणली होती. यात कॉँग्रेस आय, भाराकॉँ यांच्याबरोबरच भारतीय रिपब्लिकन पक्षाने मैदानात उडी घेतली होती. या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह सात अपक्ष उमेदवारांनी आपले राजकीय नशिब आजमावले. येथे हिरे घराण्यातील महिलांनी प्रथमच उमेदवारी केली. यात व्यंकटराव हिरे यांच्या पत्नी पुष्पाताई हिरे यांना भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस (अर्स) तर्फे तर कॉँग्रेस (आय) तर्फे इंदिराताई बळीराम हिरे यांना उमेदवारी मिळाली. देवराज गरुड यांनी भारिपतर्फे उमेदवारी केली. हिरे घराण्यातील दोघाही महिला उमेदवारांमध्ये निवडणूक पुन्हा अटीतटीची झाली. कॉँग्रेस आयतर्फे प्रचारासाठी केंद्रातील नेते के. सी. पंत, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, अंबिका सोनी आले होते. कॉँग्रेस (अर्स)च्या प्रचाराची धुरा शरद पवार यांनी सांभाळली होती. भारिपचे उमेदवार देवराज गरूड यांच्या प्रचारासाठी रा. सु. गवई यांनी प्रचारात रंगत आणली होती. त्यांनी प्रचारात भूमीहिनांना जमिनी, राखीव जागा आरक्षण, महागाई, गरिबी हटाव आदि मुद्दे वापरले होते.
या निवडणुकीत पुष्पाताई हिरे यांनी मागील निवडणुकीत पती व्यंकटराव हिरे यांच्या झालेल्या पराभवाचा वचपा काढला. भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस (अर्स)च्या उमेदवार असलेल्या पुष्पाताई हिरे यांनी ३९ हजार ८७६ मते घेऊन प्रतिस्पर्धी कॉँग्रेस (आय)च्या उमेदवार इंदिराताई हिरे यांचा ३ हजार २२८ मतांनी पराभव केला होता. इंदिराताई हिरे यांना ३६ हजार ६४४ मते मिळाली होती. निवडणुकीत प्रथमच भारीपतर्फे उमेदवारी करणारे देवराज गरुड यांना अवघ्या १६०० मतांवर समाधान मानावे लागले.
१९८५ मध्ये शरद पवार यांच्या पुरोगामी लोकशाही दलाला नाशिक जिल्ह्याने भरभरून साथ दिली. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मतदारसंघातून पुलोदचे उमेदवार निवडून आले होते. याचे बक्षीस म्हणूनच पुष्पाताई हिरे यांना शरद पवार यांनी मंत्रिमडळात समावेश करून त्यांचा सन्मान केला. त्यांना परिवहन व उर्जा राज्यमंत्री मंत्रिपद देण्यात आले होते.
मालेगाव तालुक्यातील दाभाडी विधानसभा क्षेत्रामध्ये कॉँग्रेसची सत्ता अबाधित राहिली. मग ते कॉँग्रेस (अर्स) अथवा भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस असो. महाराष्ट्राच्या राजकारणात दाभाडीचा सत्तेत राहण्याचा वरचष्मा राहिला आहे. नाशिक जिल्ह्यातून दाभाडीचा विजयी उमेदवार मंत्रीपद भुषवत होता. हिरेंच्या गाव पातळीच्या राजकारणात इतर नवीन चेहऱ्यांना वाव नव्हता तर समाजवादी, जातीयवादी पक्षांचा दाभाडीच्या राजकारणात शिरकाव झालेला नव्हता. त्यामुळे कॉँग्रेस विजयी होते व हिरेंच्या नेतृत्वाने राजकारण व समाजकारण चालते अशी बोचरी टिका जाणकार मंडळीकडून केली जात होती. व्यंकटराव हिरे, डॉ. बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे यांच्या रुपाने तालुक्याला १९७८ ते १९८५ च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री, शिक्षणमंत्री यासारखी महत्वाची पदे मिळाली आहेत. त्यामुळे दाभाडी मतदारसंघ नेहमी राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिला आहे.