राज्यावरील विजेचे संकट तूर्त टळले
By Admin | Updated: May 10, 2017 18:50 IST2017-05-10T18:50:46+5:302017-05-10T18:50:46+5:30
मागणीत घट : केंद्राच्या कोट्यातून पुरेशी वीज उपलब्ध

राज्यावरील विजेचे संकट तूर्त टळले
नाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच विजेची मागणीही वाढू लागल्याने राज्यात तातडीचे भारनियमन लागू करण्यात आले असले तरी गेल्या रविवारपासून मागणीत घट झाल्याने भारनियमनापासून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या रविवारपासून राज्यात कुठेही भारनियमन करण्यात आले नसल्याचा दावा महानिर्मिती कंपनीने केला आहे.
विजेची वाढलेली मागणी आणि वीजनिर्मितीत झालेली घट यामुळे राज्यावर भारनियमन करण्याची वेळ आली होती. परंतु आता राज्याच्या वीजनिर्मिती केंद्राची क्षमता १७ हजार मेगावॅटपर्यंत गेल्याने आणि केंद्राकडून मिळणारा विजेचा वाटाही मिळू लागल्याने राज्यावरील विजेचे संकट तुर्तास टळले आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे मागणीतील चढउतारामध्ये साधारणपणे १०० ते १५० मेगावॅटचाच फरक आहे. त्यामुळे भारनियमन झाले तरीही फारकाळ भारनियमन होऊ शकत नसल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.