मजूर संघावर ‘सहकार’ची सत्ता
By Admin | Updated: March 7, 2016 00:19 IST2016-03-07T00:08:30+5:302016-03-07T00:19:57+5:30
गड कायम राखला : सर्वच्या सर्व जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार

मजूर संघावर ‘सहकार’ची सत्ता
नाशिक : नाशिक जिल्हा मजूर सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनलने सत्ता कायम राखली असून, जिल्हास्तरावरील राखीव पाचही जागांवर विजय मिळविला आहे़ दरम्यान, दिंडोरी, इगतपुरी, मालेगाव तालुका संचालकपदाच्या लढती अपेक्षेप्रमाणे एकतर्फी होऊन चांदवड, निफाड, सिन्नर व नाशिक या चार तालुक्यांतील संचालकपदाच्या लढती संघर्षपूर्ण झाल्या आहेत़ मजूर संघाच्या संचालकपदाच्या २० जागांपैकी १२ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, आठ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती़
गंगापूररोड येथील अभिनव बालविकास मंदिरात रविवारी (दि़६) सकाळी आठ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली़ सात तालुका संचालक व अनुसूचित जाती संवर्गातील एक अशा आठ जागांसाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते़ सायंकाळी चार वाजेपर्यंत मजूर संघाच्या ११२९ मतदारांपैकी ९३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ यानंतर द्वारका येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सतीश खरे यांच्या उपस्थितीत साडेचार वाजेच्या सुमारास मतमोजणीस सुरुवात
झाली़
सायंकाळी सहा वाजेपर्यंत मजूर संघांच्या आठही जागांची मतमोजणी प्रकिया पूर्ण झाली निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला होता़ (प्रतिनिधी)