कुक्कुट पालनाला आला ‘ताप’
By Admin | Updated: April 2, 2016 23:16 IST2016-04-02T23:09:17+5:302016-04-02T23:16:22+5:30
तडाखा : उष्णतेमुळे पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले; ८० टक्के पोल्ट्रीशेड ओस

कुक्कुट पालनाला आला ‘ताप’
शैलेश कर्पे सिन्नर
तपमानात वाढ झाल्याने त्याचा विपरीत परिणाम कुक्कुटपालन व्यवसायावर होऊ लागला आहे. वाढत्या उष्म्यामुळे पक्षी दगावण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कुक्कुट पालन व्यवसाय करण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. टंचाईमुळे अनेक पोल्ट्री शेड ओस पडले आहेत. त्यामुळे कुक्कुट पालन व्यवसाय धोक्यात आल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील पांगरी येथे सुमारे चारशेच्या वर पोल्ट्रीशेड आहेत. मात्र त्यातील ८० टक्के शेड पाणीटंचाईमुळे रिकामे पडून आहेत. वाढत्या उष्म्याने उत्पादनात घट आल्याने बाजारात चिकनचे भाव वाढले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात दूध, अंडी व चिकनच्या उत्पादनात घट येते. सध्या वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढल्याने पक्ष्यांच्या मरतुकीत वाढ होत आहे. उत्पादनात उन्हाळ्यात घट येत असल्याने पोल्ट्रीधारक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पूर्वी या व्यवसायाला शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुय्यम दर्जा होता. कोणी गावठी कोंबड्या तर कोणी गायी-म्हशी पाळून शेतीला पूरक व्यवसाय करीत होते. तथापि, यामध्ये व्यावसायिकता वाढू लागल्याने या पूरक व दुय्यम दर्जाचे व्यवसाय अनेक शेतकऱ्यांचे मुख्य साधन बनले असल्याचे चित्र आहे.
शेतातील पिकांतून शेतकऱ्यांच्या हातात पैसा मिळत नाही. त्यावेळी पूरक व्यवसायातूनच शेतीत भांडवल टाकून शेती उभी करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक शेतकरी व्यापारी दृष्टिकोणातून त्याकडे पाहू लागले आहेत. वेगवेगळ्या जातीचे पक्षी बाजारात उपलब्ध होत आहेत. कमी कालावधीत पक्ष्यांची वाढ होत असल्याने जास्तीत जास्त ४० दिवसात पक्षी विक्रीसाठी तयार होत असतात. अनेक कंपन्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करून करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत जाऊन कोंबड्या विक्रीचा प्रश्न मिटला आहे. सध्या शेतकऱ्यांना केवळ पक्षी सांभाळावे लागत आहेत.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पोल्ट्रीफार्म उभारले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान तीन ते पाच हजार पक्षी क्षमतेचे शेड आहेत. काही शेतकरी कर्ज काढून हा व्यवसाय करीत आहेत. पोल्ट्रीसाठी लागणारी पिल्ले, औषधे, खाद्याचा पुरवठा कंपनी करीत असतात. त्यांच्यावर देखरेखीसाठी खास कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात येते. तयार झालेल्या कोंबड्या कंपन्या घेऊन जात असल्याने शेतकऱ्यांना कोंबड्या बाजारात घेऊन जाण्याची तसदी होत नाहीच परंतु मार्केटिंग करण्याचीही गरज राहिलेली नाही.
या व्यवसायात सध्या व्यावसायिकांना पाणीटंचाई, बदलते वातावरण, विविध रोगांचा प्रतिकार करण्याची होणारी धावपळ व अपेक्षित दिवसांत पक्ष्यांचे न वाढणारे वजन या कारणांनी सिन्नर तालुक्यातील पोल्ट्रीधारकांची संख्या कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. तालुक्यात सर्वात जास्त पोल्ट्रीफार्म पांगरी येथे होते. परंतु उत्पादनात येणारी घट पाहून अनेक शेतकऱ्यांनी हा व्यवसाय बंद केल्याचे चित्र आहे.
दरम्यान, उन्हाळ्यात विशेषत: एप्रिल व मे महिन्यात पक्षी दगावण्याची संख्या वाढते. त्यामुळे अनेक शेतकरी पोल्ट्रीफार्ममध्ये पक्षी ठेवत नाही. ज्यांनी पक्षी ठेवले त्यांना हे पक्षी वाढविणे आव्हानात्मक काम असून, पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने शेतकऱ्यांंचे नुकसान होत आहे. मात्र एप्रिल ते जूनमध्ये बाजारात चिकनचा पुरवठा कमी व मागणी वाढते त्यामुळे चांगली किंमत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांची सध्या धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)