अभोणेकरांच्या नशिबी खड्डेच खड्डे
By Admin | Updated: July 14, 2016 00:43 IST2016-07-14T00:26:30+5:302016-07-14T00:43:05+5:30
प्रवासी वर्गात संताप : डागडुजी केवळ नावापुरतीच, सततच्या अपघातांमुळे नागरिक त्रस्त

अभोणेकरांच्या नशिबी खड्डेच खड्डे
संताप : डागडुजी केवळ नावापुरतीच, सततच्या अपघातांमुळे नागरिक त्रस्तकळवण : पावसाळा येताच रस्त्यांवरील खड्डे उघडे पडणे व ते वाढत जाणे ही समस्या नवीन नाही. हाच कित्ता यावर्षीही पहावयास मिळत असल्याने अभोणेकरांना त्याचे नवल वाटत नाही. अभोणा चौफुली परिसरातील रस्त्यावरील मोठंमोठे खड्डे आता अपघातास कारणीभूत ठरत आहेत.
रात्रीच्या वेळी पावसाच्या पाण्याने भरलेला खड्डा लक्षात येत नसल्याने धोका वाढला आहे. रस्ते खोदाईमुळे पडलेल्या चाऱ्या, खड्डे यात पावसाचे पाणी साचून अभोण्यातील रस्त्यांना गटारांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे गरजेचे आहे. पण ते नियमितपणे इमाने इतबारे केले जात नाही, अशी अभोणेकरांची तक्रार आहे. परिणामी दरवर्षी खड्ड्यांची मालिका वाढत चालली असून, जुन्या खड्ड्यांची लांबी व खोलीही वाढत आहे. यंदाही पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची विशेष दुरु स्ती झालेली नाही. रस्तादुरुस्ती न झाल्याने पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडल्याचे निदर्शनास येत आहे. अवजड वाहनांच्या रहदारीमुळे या रस्त्यावरील खड्ड्यांचा व्यास दररोज वाढत चालला आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहात असल्याने ते वाहनचालकांना दिसून येत नाही. परिणामी अपघाताची दाट शक्यता बळावली आहे. या रस्त्यावरून रोज शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात; पण सार्वजनिक बांधकाम विभाग हे खड्डे केव्हा बुजवतील , असा सवाल या मार्गावरील प्रवाशांना व विद्यार्थ्यांना पडला आहे.
निवेदन देऊन ही परिस्थिती ‘जैसे थे’. गेल्या महिन्यात येथील साई समर्थ ग्रुपच्या युवकांनी अभोणा चौफुलीवरील खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाला निवेदन दिले होते. त्यावेळेस खड्ड्यांवर तात्पुरता मुलामा देण्यात आला. परंतु आज रोजी रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाल्याने संबंधित विभागाने लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास रस्त्यावर झाडे लावून रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा साई समर्थ ग्रुपच्या चेतन दिवाण, रोशन वाघ, कुणाल सोनवणे, दिलीप सोनवणे, गणेश सूर्यवंशी आदि कार्यकत्यांनी दिला आहे. (वार्ताहर)