नाशिक-पुणे महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
By Admin | Updated: November 25, 2015 23:01 IST2015-11-25T22:58:20+5:302015-11-25T23:01:12+5:30
अपघातांना निमंत्रण : नांदूरशिंगोटे परिसरात सर्वाधिक दुरवस्था; दुरुस्तीची मागणी

नाशिक-पुणे महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे या ५० क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर ते संगमनेरदरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने महामार्ग धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर अक्षरश: खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्तादुरुस्तीची अनेकदा मागणी करूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेषत: नांदूरशिंगोटे परिसरात नाशिक-पुणे महामार्गाची अक्षरश: चाळण झाल्याचे चित्र आहे.
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेमोसमी पावसाने या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्यांचा आकार मोठा झाला आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे तयार झाल्याने ते अपघाताना निमंत्रण देणारे ठरू लागले आहेत. या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास परिसरातील दोडीपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पावसामुळे महामार्गाची जणू चाळण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात महामार्गावर खड्डे पडतात. विशेष म्हणजे हा महामार्ग पुण्यापासून थेट नांदूरशिंगोटेजवळील एक किलोमीटरपर्यंत सुस्थितीत आहे. मात्र तेथून पुढे नाशिककडील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. पावसाने खड्ड्यांच्या संख्येत वाढ झाल्याने रस्त्याची आणखीच दुरवस्था झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
येथील निमोण नाका व चास नाका येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने ग्रामस्थ, शाळकरी मुले, व्यापारी व वाहनचालकांचे हाल होत आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होतात. खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत व घडत आहे; मात्र रस्ता दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय कार्यालय संगमनेर येथे असून,
नाशिक अथवा पुण्याकडून येणारे अधिकारी याच मार्गाने प्रवास
करतात. या रस्त्याने मालवाहतूक करणारे ट्रक, प्रवासी वाहने, खासगी बस, राज्य परिवहन विभागाच्या बसेस, पर्यटकांचे खासगी वाहने व दुचाकी यांची संख्या लक्षणीय असून, महामार्ग रात्रंदिवस सुरू असतो. नांदूरशिंगोटे येथे सिन्नर बाजार समितीचा उपबाजार आवार असून, येथे सोमवारी व शुक्रवारी बाजारासाठी गर्दी होते. कांद्याचे मालट्रक भरून देशात विविध ठिकाणी पाठविण्यात येतात. मात्र खड्ड्यांमुळे अवजड वाहनांचे मोठे नुकसान होत असल्याने वाहनचालक माल घेऊन जाण्यास नकार देतात. त्यामुळे व्यापारीही अडचणीत येत आहेत.
चास व निमोण रस्त्याची काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. नांदूरशिंगोटे गावास चोहोबाजूने जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य दीपक बर्के, रवींद्र शेळके, गोपाळ शेळके, श्रीकांत वाघचौरे, भारत दराडे, संजय शेळके, मंगेश शेळके, संदीप शेळके, रामदास सानप, सुदाम आव्हाड, दत्ता सानप, राजेंद्र दराडे, संजय आव्हाड यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)