डाक सेवकांच्या संपामुळे टपाल बटवडा ठप्प
By Admin | Updated: March 20, 2015 00:05 IST2015-03-19T23:48:01+5:302015-03-20T00:05:56+5:30
डाक सेवकांच्या संपामुळे टपाल बटवडा ठप्प

डाक सेवकांच्या संपामुळे टपाल बटवडा ठप्प
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवकांचा संप सुरूच असून, त्यामुळे बटवड्यावर मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे. शेकडो पत्र पडून आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारकडे याबाबत चर्चा सुरू असून, लवकरच तोडगा निघण्याची शक्यता संप पुकारणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात सुमारे साडेचारशे डाक सेवक असून, आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियनने संप पुकारला आहे. त्यात बहुतांशी डाक सेवक सहभागी झाले आहेत. ग्रामीण डाक सेवकांना त्वरित खात्यात समाविष्ट करा, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर डाक सेवकांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करा, प्रस्तावित खासगीकरण थांबवा, उद्दिष्टपूर्तीसाठी कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नका, अशा विविध मागण्यांसाठी १० मार्चपासून हे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील टपालसेवा विस्कळीत झाली आहे. विशेषत: वीज, टेलिफोनसह अनेक देयके ग्राहकांपर्यंत पोहचली नाहीत, तसेच टपालाचा सर्व प्रकारचा भरणादेखील थांबला आहे.
संघटनेचे नेते दिल्ली येथे टपाल सचिवांशी चर्चा करीत असून, आत्तापर्यंत दोन बैठका झाल्या; परंतु तोडगा निघू शकलेला नाही. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप कायम राहील, असे संघटनेचे अध्यक्ष आर. एस. जाधव, सचिव सुनील जगताप, कोषागार कृष्णा गायकवाड यांनी कळविले आहे.