सटाण्यात परप्रांतीयांच्या दुकानात पोस्टर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:20 IST2017-08-04T23:30:22+5:302017-08-05T00:20:45+5:30
मनसेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सटाणा शहरातील परप्रांतीयांच्या दुकानांमध्ये परप्रांतीयांनी महाराष्ट्रात मराठी भाषा बोलावी, अशा आशयाचे पोस्टर लावले आहेत.

सटाण्यात परप्रांतीयांच्या दुकानात पोस्टर्स
सटाणा : मनसेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सटाणा शहरातील परप्रांतीयांच्या दुकानांमध्ये परप्रांतीयांनी महाराष्ट्रात मराठी भाषा बोलावी, अशा आशयाचे पोस्टर लावले आहेत. ‘महाराष्ट्र राज्यात पाहुणे बनून राहू नका, महाराष्ट्रात मराठीच बोला, ग्राहकांशी मराठीतून बोलायला शिका, जय महाराष्ट्र’ या मथळ्याची ही पोस्टर्स आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सटाणा शहराध्यक्ष हर्षवर्धन संजय सोनवणे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात येत आहे. मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा असून, माय मराठी जतन करणे हे आपले
कर्तव्य असल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या भाषेची विशिष्ट ओळख आहे. मग महाराष्ट्रात मराठीची वेगळी ओळख का नको, असा सवालही हर्षवर्धन सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी महाराष्ट्र विद्यार्थी नवनिर्माण सेनेचे अनिकेत पाटील, हर्षद जाधव, कौस्तुभ सोनवणे, अमृत निकम, परेश देवरे, अन्वर शहा आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.