सहाऐवजी नऊ प्रभाग समित्यांची शक्यता
By Admin | Updated: April 4, 2017 02:34 IST2017-04-04T01:47:06+5:302017-04-04T02:34:45+5:30
नाशिक : लोकसंख्येच्या प्रमाणानुसार शहरात सहाऐवजी नऊ प्रभाग समित्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे.

सहाऐवजी नऊ प्रभाग समित्यांची शक्यता
नाशिक : लोकसंख्येच्या प्रमाणानुसार शहरात सहाऐवजी नऊ प्रभाग समित्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे. परंतु, प्रशासनाने अपुऱ्या मनुष्यबळाअभावी सहाच प्रभाग ठेवण्याची विनंती केली असली तरी अधिकाधिक नगरसेवकांना पदांचा लाभ मिळावा, याकरिता सत्ताधारी भाजपाकडून महापालिकेत नऊ प्रभाग समित्यांच्या स्थापनेवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत महापालिकेचे नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सिडको, सातपूर, पंचवटी व नाशिकरोड असे सहा विभाग आणि त्यानुसार सहा प्रभाग समित्या कार्यरत आहेत. नाशिक शहराची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार १४ लाखांपेक्षाही अधिक असल्याने लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सहाऐवजी नऊ प्रभाग समित्यांची स्थापना होणे आवश्यक आहे. त्याबाबतचा प्रस्तावही प्रशासनाने येत्या महासभेत ठेवला असला तरी अपुरे मनुष्यबळ, वाढता आस्थापना खर्च पाहता नऊऐवजी सहाच प्रभाग समित्या कायम ठेवण्याची विनंती केली आहे. त्यानुसार, प्रशासनाने ३१ प्रभागांची विभागणीही केली आहे. मात्र, महापालिकेत एकहाती सत्ता संपादन करणाऱ्या भाजपाकडून प्रशासनाची विनंती ठोकरली जाण्याची शक्यता असून, निवडून आलेल्या नगरसेवकांना अधिकाधिक पदांचा लाभ पोहोचविण्यासाठी नऊ प्रभाग समित्यांची रचना केली जाण्याची शक्यता आहे. महासभेने नऊ प्रभाग समित्यांची रचना करण्याचे आदेश दिल्यास महापालिका प्रशासनाला ३१ प्रभागांची विभागणी करावी लागणार असून, काही विभागांमध्ये चार तर काही विभागांमध्ये तीन प्रभाग समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)