एप्रिलअखेर बंद पथदीप उजळण्याची शक्यता
By Admin | Updated: April 22, 2015 01:36 IST2015-04-22T01:35:04+5:302015-04-22T01:36:39+5:30
एप्रिलअखेर बंद पथदीप उजळण्याची शक्यता

एप्रिलअखेर बंद पथदीप उजळण्याची शक्यता
नाशिक : खांब आहेत, पण दिवे नाहीत आणि दिवे आहेत, तर लागत नाहीत अशी स्थिती शहरात सर्वत्र असल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणाऱ्या महापालिकेच्या ताब्यात आठवडाभरात विद्युत साहित्य उपलब्ध होणार असून, एप्रिलअखेर बंद पथदीप उजळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, न्यायप्रविष्ट असलेल्या एलइडीबाबतचा घोळ अद्यापही मिटलेला नसून वकिलांशी चर्चेच्या पातळीवरच प्रश्न फिरत आहे. महापालिकेने शहरात सुमारे ६४ हजार एलइडी फिटिंग्ज लावण्याचा ठेका दिला होता; परंतु त्याच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित केले गेल्याने प्रशासनाने काम थांबविले होते. त्यानंतर प्रकरण न्यायालयात जाऊन पोहोचले असून, प्रशासनाकडून वकिलांशी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. एलइडीप्रकरण थंडावले असतानाच शहरातील ठिकठिकाणी पथदीप बंद पडल्याने नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी कमालीचा संताप आहे. शहरात अनेक भागांमध्ये विशेषत: नववसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर पथदीप बंद आहेत. काही भागात खांबावरील दिव्यांचा प्रकाश मंद पडतो, तर काही भागात अंधाराचे साम्राज्य असते. महापालिकेच्या उद्यानांमध्येही उभारण्यात आलेल्या हायमास्टवरील दिवे बंद स्थितीत आहेत.