आरटीई प्रवेशप्रकिया लांबण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:16 IST2021-04-23T04:16:19+5:302021-04-23T04:16:19+5:30

नाशिक : आरटीई प्रवेशासाठी यंदा राज्यस्तरावरून ऑनलाइन सोडत जाहीर करण्यात आल्यानंतर पालकांना गुरुवारपासून (दि. १५) एसएमएसद्वारे प्रवेशाची माहिती ...

Possibility of delay in RTE admission process | आरटीई प्रवेशप्रकिया लांबण्याची शक्यता

आरटीई प्रवेशप्रकिया लांबण्याची शक्यता

नाशिक : आरटीई प्रवेशासाठी यंदा राज्यस्तरावरून ऑनलाइन सोडत जाहीर करण्यात आल्यानंतर पालकांना गुरुवारपासून (दि. १५) एसएमएसद्वारे प्रवेशाची माहिती उपलब्ध झाली असली तरी या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यात शासनाने कोरोनामुळे ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्यता निर्माण झाली असून आता ही प्रक्रिया आता मे महिन्यात होऊ शकेल.

नाशिकमध्ये आरटीई प्रवेशासाठी जिल्हाभरातील ४ हजार ५४४ जागांसाठी तब्बल १३ हजार ३२७ अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी ४ हजार २०८ विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासाठी लॉटरीद्वारे निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी शिक्षण विभागाने पडताळणी समितीकडे गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेनुसार लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता पालकांना पडताळणी समितीकडे जावे लागेल. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार असल्याने पालकांना अनिवार्य कागदपत्रे जमा करून ठेवण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले होते. परंतु, आरटीई संकेतस्थळावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये , प्रवेशाबाबत लॉकडाऊन संपल्यानंतर संकेतस्थळावर सूचना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

इन्फो-

संकेतस्थळावरून प्रवेशाबाबत खात्री करावी

प्रवेशप्रक्रिया २०२१-२०२२ या वर्षाकरिता लॉटरीद्वारे पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून एसएमएस प्राप्त झाले असले तरी पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून राहू नये. आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाची तारीख बघता येईल. प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. ज्या विद्यार्थ्यांची लॉटरीमध्ये निवड झालेली आहे, त्यांनी प्रवेशाकरिता एसएमएसद्वारे पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच पडताळणी समितीकडे जावे असे आवाहनही संकेतस्थळावर करण्यात आले आहे.

Web Title: Possibility of delay in RTE admission process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.