वाडीवऱ्हे सोने लूट प्रकरणी एक ताब्यात
By Admin | Updated: July 30, 2015 00:27 IST2015-07-30T00:27:19+5:302015-07-30T00:27:26+5:30
हरिद्वार येथून अटक : सव्वातीन कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

वाडीवऱ्हे सोने लूट प्रकरणी एक ताब्यात
घोटी : संपूर्ण राज्यात खळबळ उडालेल्या वाडीवऱ्हे येथील ५८ किलो सोन्याच्या लुटीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी यातील एका संशयित दरोडेखोराला पकडण्यात यश मिळविले आहे. या संशयिताकडून सोन्याच्या दहा बिस्किटांसह त्यातून खरेदी केलेल्या तब्बल सव्वातीन कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दि. २४ एप्रिल रोजी मुंबईहून शिरपूर गोल्ड रिफायनरी कंपनीमध्ये प्रत्येकी एक किलो वजनाचे साठ बिस्किटे घेऊन जाणाऱ्या सिक्वेल लॉजेस्टिकच्या वाहनाला (एमएच ०२ सीई ४०१०) संशयितानी अडवले. पाच दरोडेखोरानी चालक व सुरक्षा रक्षकांना पिस्तुलाचा धाक दाखवून १५ कोटी ६९ लाख रुपये किमतीची ५८ सोन्याची बिस्किटे लुटून नेली होती. हा प्रकार वाडीवऱ्हेजवळ घडला होता.
पोलिसांसमोर या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान होते. जिल्हा पोलीसप्रमुखासह वरिष्ठ अधिकारी अनेक दिवस तळ ठोकून होते. दरम्यान, अशाच प्रकारचा गुन्हा ठाणे येथील नौपाडा परिसरात घडला होता. पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत असताना या गुन्ह्यातील आरोपीनेच वाडीवऱ्हे येथील लूट केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल पोफळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बनकर आदिंना मिळाली. त्यानुसार भोपाळ, मध्य प्रदेश, आजमगड, उत्तर प्रदेश, सुरत, गुजरात आदि भागांत पोलिसांची पथके पाठविण्यात आली. यातील एक संशयित हरिद्वार येथे असल्याच्या माहितीवरून पोलीस पथकाने येथील आयेशा कॉलनीत छापा टाकत निशान ऊर्फ सद्दाम खान यास ताब्यात घेतले. पोलिसाच्या झडतीत २६ लाख रुपयांची दहा सोन्याची बिस्किटे, १२ लाख ५० हजार रु पयांची रोख रक्कम, १४ लाख रुपये किमतीची कार, एक देशी पिस्तूल, ६५ हजार रुपये किमतीचे दोन फोन, एक डीव्हीडी प्लेअर, ७०० रुपयांचे नेपाळी चलन, असा तीन कोटी १८ लाख ८७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (वार्ताहर)