पॉझिटिव्हीटी रेट २.५ टक्क्यांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:25+5:302021-09-03T04:16:25+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुक्तांच्या तुलनेत बाधित अधिक आढळण्याचे प्रमाण गुरुवारीदेखील कायम राहिले. जिल्ह्यात एकूण कोरोनामुक्त ८६ तर नवीन ...

पॉझिटिव्हीटी रेट २.५ टक्क्यांवर !
नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुक्तांच्या तुलनेत बाधित अधिक आढळण्याचे प्रमाण गुरुवारीदेखील कायम राहिले. जिल्ह्यात एकूण कोरोनामुक्त ८६ तर नवीन बाधितांची संख्या १३६ झाली असल्याने उपचारार्थी रुग्णसंख्या तब्बल १०६३ वर पोहोचली आहे, तर अहवालांच्या तुलनेत रुग्ण बाधित आढळण्याचे प्रमाण अर्थात पॉझिटिव्हीटी रेटदेखील तब्बल २.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी सर्वच स्तरांवरील वाढ आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी ठरणार आहे.
जिल्ह्यात नव्याने बाधित आढळलेल्या १३६ रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणची संख्या ८० तर नाशिक मनपाचे ५१ आणि जिल्हाबाह्य ५ असे प्रमाण आहे. दरम्यान, जिल्ह्यात मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये ३ जण नाशिक मनपा क्षेत्रातील तर १ नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यात मृत्युसंख्या ४ वर पोहोचली असून त्यामुळे एकूण बळींची संख्या ८५८७ वर गेली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये नवीन रुग्णसंख्या वाढत असली तरी बळींमध्ये शहरातील संख्या अधिक आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्यादेखील ७२४ वर पोहोचली असून त्यात ३१८ नाशिक ग्रामीणचे, १९६ नाशिक मनपाचे तर २१० मालेगाव मनपाचे अहवाल प्रलंबित आहेत. तर जिल्ह्यातील कोरोनामुक्तच्या प्रमाणातही अल्पशी घट आलेली असून हे प्रमाण ९७.६२ टक्क्यांवर आले आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट १ ते १.५ टक्क्यांवरून जवळपास दुप्पट वाढून २.५ टक्क्यांवर पोहोचला असून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब ठरण्याची चिन्हे आहेत.