वस्त्रोद्योगाबाबत सकारात्मक निर्णय
By Admin | Updated: July 22, 2016 01:02 IST2016-07-22T00:57:59+5:302016-07-22T01:02:19+5:30
स्मृती इराणी : यंत्रमागधारकांच्या शिष्टमंडळाची वस्त्रोद्योगमंत्र्यांशी चर्चा

वस्त्रोद्योगाबाबत सकारात्मक निर्णय
आझादनगर (मालेगाव) : यंत्रमागधारकांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांबाबत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीमती इराणी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात आमदार आसीफ शेख, भिवंडीचे कपील पाटील, मालेगाव भाजपा महानगर अध्यक्ष सुनील गायकवाड यांचा समावेश होता. पावसाळी अधिवेशन संपताच देशातील सर्वच वस्त्रोद्योग संघटनांच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेऊन त्वरित सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही श्रीमती स्मृती इराणी यांनी शिष्टमंडळास दिली.
विविध कारणांमुळे बाजारपेठेत आलेली मंदी, याशिवाय सुताच्या भावात झालेली भरमसाठ वाढ यामुळे कच्च्या मालात तेजी व तयार मालास मागणीअभावी कमी भाव मिळत असल्याने यंत्रमाग व्यवसाय दिवसेंगणिक तोट्यात जात असल्याची माहिती शिष्टंमंडळाने यावेळी स्मृती इराणी यांना दिली. शासनाच्या अनुदानाविना रोजगार उपलब्ध करून देणारा देशातला दुय्यम उद्योग असूनही अखेरच्या घटका मोजत आहे. यामुळे केंद्र सरकारने कापड निर्यात धोरणात बदल करुन इतर देशातील कापडामुळे भारताच्या कपड्याला जास्त मागणी कशी होईल यासाठी प्रयत्न करावे. राज्य सरकारकडून मागील एक वर्षाचे वीज बिल माफ करावे. प्रति यंत्रमाग ५० हजाराचे अनुदान द्यावे यावर चर्चा करण्यात आली. यावेळी साजीद अन्सारी, मुकेश झुनझुनवाला, भिवंडीचे शोएब गुड्डू, मौलाना अय्युब कासमी, महेमुद खान, अॅड. हिदायतउल्लाह मोहंमद जाफर पानवाला, मौलाना जाहीद नदवी यांचा शिष्टमंडळात समावेश होता. (वार्ताहर)