गुन्हे रोखण्यासाठी कुली सरसावले
By Admin | Updated: July 30, 2016 00:56 IST2016-07-30T00:16:05+5:302016-07-30T00:56:13+5:30
मनमाड : पोलीस आणि रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

गुन्हे रोखण्यासाठी कुली सरसावले
मनमाड : शहरात रात्रीच्या अंधारात दुकाने फोडण्याच्या वाढत्या घटनांबाबत लोकमतमधून ‘वाढत्या चोऱ्यांमुळे घबराट’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. रात्रीची गस्त वाढवण्याबरोबरच चोरट्यांना पसार होण्यासाठी सुकर असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकाकडे पोलिसांनी लक्ष वाढवले आहे.
रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकावर कुलींना संशयास्पद प्रवासी आढळल्यास ते पोलिसांना सतर्क करणार असल्याचा निर्णय आज कुली लोकांनी शहर पोलीस ठाणे, लोहमार्ग पोलीस ठाणे, रेल्वे सुरक्षा बल अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ‘सारी दुनियाका बोझ हम उठाते है’ असे म्हणणाऱ्या कुली लोकांनी शहरातील गुन्हे रोखण्यास मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
शहरातील वाढत्या चोऱ्यांबाबद तपासलेले सीसीटीव्ही फुटेज व अन्य चौकशीतून बहुतांश चोरटे हे बाहेरगावहून येत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मनमाड हे रेल्वेचे जंक्शन असल्याने रात्रीच्या वेळी दर अर्ध्यातासाला येणारी गाडी चोरट्यांना पसार होण्यासाठी सोयीस्कर होत आहे. या दृष्टिकोनातून पोलिसांनी रेल्वे स्थानकाकडे लक्ष व वाढवले आहे. रात्रीच्या वेळी स्टेशन परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. यामधे मदत व्हावी या हेतूने मनमाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुंडलिकसपकाळे यांच्या पुढाकारातून मनमाड रेल्वे स्थानकावर अधिकारी व कुली यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रात्रीच्या वेळी रेल्वे गाड्या आल्यानंतर किंवा फलाटावर संशयास्पद प्रवासी आढळल्यास पोलीस प्रशासनाला कळविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी स्टेशन प्रबंधक एस. बी. सिंग, रेसुब निरीक्षक के. डी. मोरे, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर भावल,उपनिरीक्षक रजनीश यादव, आर. के. मिना, एम.के. सैनी, मुकादम मधुकर गिते, शेख मुक्तार यांच्यासह कुली उपस्थित होते. (वार्ताहर)