सभागृहात कोसळले पीओपीचे खांब
By Admin | Updated: January 12, 2017 00:05 IST2017-01-12T00:05:15+5:302017-01-12T00:05:15+5:30
महापालिकेच्या भाभानगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात नाशिक व्हिजन नावाच्या सेवाभावी संस्थेचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू

सभागृहात कोसळले पीओपीचे खांब
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 12 - महापालिकेच्या भाभानगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात नाशिक व्हिजन नावाच्या सेवाभावी संस्थेचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना अचानकपणे मंचाच्या वरच्या बाजूस असलेले पीओपीचे खांब कोसळून चौघे जखमी झाल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी (दि.८) नाशिक व्हिजन संस्थेच्या वतीने युथ फेस्टिव्हल नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम गायकवाड सभागृहात आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मंचाच्या वरच्या बाजूस छतासारखे लावलेले पीओपीचे आडवे खांब अचानकपणे कोसळले. सुदैवाने यावेळी आपले कलागुण सादर करणारे काही तरुण कलावंत थोडक्यात बचावले; मात्र या घटनेत संस्थेचे स्वयंसेवक दुर्गेश बिरारी, तेजस्विनी कुमावत व डीजे आॅपरेटर आणि त्याचा सहकारी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर दोन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चैतन्य व्यवहारे यांनी दिली आहे. याप्रकरणी सभागृहाच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संस्थेच्या वतीने व्यवहारे व नंदन भास्करे यांनी मुंबई नाका पोलिसांकडे अर्जाद्वारे केली आहे. सदर घटनेत साऊंड सिस्टमचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर उरलेले सर्व नृत्यप्रकार ऐनवेळी रद्द करण्यात आले कारण कोणतेही कलावंत त्यांचे कलागुण सादर करण्याचे धाडस मंचावर करत नव्हते असे व्यवहारे यांनी सांगितले. सभागृहाच्या बैठक व्यवस्थेच्या दिशेने मंच जेथे संपतो त्याच ठिकाणी पीओपी कोसळल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारे कलावंत बालंबाल बचावले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. याप्रकरणी दोषी आढळणाºयांवर महापालिका आयुक्तांसह पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.