डेरेदार झाडांचा श्वास गुदमरला
By Admin | Updated: September 27, 2016 01:19 IST2016-09-27T01:19:19+5:302016-09-27T01:19:49+5:30
‘ट्री-गार्ड’ रुतले बुंध्यात : पर्यावरणस्नेही देणार पालिकेला अल्बम भेट

डेरेदार झाडांचा श्वास गुदमरला
नाशिक : शहरात विविध रस्त्यांच्या कडेला किंवा मोकळ्या भुखंडांवर पाच ते दहा वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या वृक्षांभोवतालच्या संरक्षक जाळ्या थेट झाडांच्या बुंध्यात रुतल्या आहेत. याकडे महापालिकेच्या उद्यान विभागाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिकरोडच्या काही तरुणांनी एकत्र येत झाडांच्या संरक्षक जाळ्यांमुळे वृक्षांची झालेली स्थिती कॅमेऱ्यात बंदिस्त केली आहे.
रोपट्याचे संवर्धनासाठी महापालिकेने संरक्षक जाळ्या बसविल्या. झाडांची संपूर्ण वाढ झाल्यानंतर झाडांभोवती लावलेल्या संरक्षक जाळ्या काढून घेणे अपेक्षित आहे; मात्र याकडे उद्यानविभागाने नेहमीप्रमाणे डोळेझाक केली आहे. यामुळे झाडांचा जीव संकटात सापडला असून, या हृदय हेलावणारी अवस्था नाशिकरोड पर्यावरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कॅ मेऱ्यात बंदिस्त केली आहेत. सुमारे पंचवीस ते तीस छायाचित्रे नाशिकरोड, उपनगर परिसरातील असून, सदर छायाचित्रांचे अल्बम समितीकडून उद्यान विभागप्रमुखांना भेट दिला जाणार असल्याची माहिती उपक्रमप्रमुख प्रसाद देशमुख यांनी दिली.
संरक्षक जाळ्यांमुळे झाडांच्या बुंध्यांना इजा होत असून, झाडांच्या वाढीला अडथळा निर्माण होऊन त्यांचे आयुष्य संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. बहुतांश ठिकाणी झाडांच्या बुंध्यांमध्ये संरक्षक जाळ्या पूर्णपणे रुतून गेल्या आहेत. सदर वृक्ष ही किमान पाच ते दहा वर्षे जुने असून, याकडे पालिकेच्या उद्यान विभागाला लक्ष देण्यास अद्याप मुहूर्त लाभलेला नाही किंंवा वृक्ष प्राधिकरण समितीनेदेखील सदर बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेली नाही हे विशेष! (प्रतिनिधी)