ताटातून तूरडाळ गायब...
By Admin | Updated: October 8, 2015 00:41 IST2015-10-08T00:39:24+5:302015-10-08T00:41:45+5:30
महागाईचा वणवा : संध्याकाळचा ‘मेनू’ बदलला; १७० रुपये प्रतिकिलो

ताटातून तूरडाळ गायब...
नाशिक : भाजपा सरकार व दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्व सर्व देशाला ‘अच्छे दिन आयेंगे’ असे स्वप्न दाखविले मात्र वर्षपूर्तीनंतरही देशवासीयांना ‘अच्छे दिन’ आलेले नाही. उलट महागाईचा वणवा देशभर पेटला असून जीवनावश्यक वस्तूंबरोबरच मिठापासून पिठापर्यंत सर्वच महागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तूरडाळीचे दर तर थेट आकाशाला भिडल्याने ताटातून तूरडाळ गायब झाली आहे.
संध्याकाळच्या भोजनात बहुसंख्य घरात गृहिणींचा ठरलेला ‘मेनू’ म्हणजे तिखट वरण किंवा साधे वरण-भात; मात्र तूरडाळ थेट दोनशे रुपये किलो झाल्यामुळे हा ‘मेनू’ कोलमडला असून वरण खाण्याचा मोह आवरता घ्यावा लागत आहे. तूरडाळ १५०-१७० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहचल्याचे किराणा विक्रेत्यांनी सांगितले. तूरडाळीबरोबरच सर्वच किराणा मालाची दरवाढ झाली आहे. हरभरा दाळीपासून तर कच्चे उडीदपर्यंत भाववाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात भाववाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक महागाईच्या वरवंट्याखाली पिचून निघत आहे. उत्पन्न कमी महागाई अधिक अशी स्थिती निर्माण झाल्याने नोकरदार वर्गाचे मासिक नियोजन कोलमडून पडले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनिवडीनुसार भोजन उपलब्ध क रणे, महागाईमुळे वस्तू खरेदीचे घटलेले प्रमाण व मासिक नियोजन यामुळे गृहिणींना स्वयंपाकघरातील व्यवस्थापन करताना नाकीनव येत आहे.