‘तेल्या’ने डाळिंब उत्पादक हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:29+5:302021-07-22T04:10:29+5:30
पाटणे : मालेगाव तालुक्यातील पाटणे परिसरात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या काही ...

‘तेल्या’ने डाळिंब उत्पादक हतबल
पाटणे : मालेगाव तालुक्यातील पाटणे परिसरात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या काही वर्षांपासून तेल्या रोगाने थैमान घातल्याने डाळिंब लागवड क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महागड्या रासायनिक औषधांची वारंवार फवारणी करणे आर्थिक भांडवलाअभावी शेतकरी बांधवांना आता अशक्य झाले आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची नितांत गरज असून मदत मिळाली तरच डाळिंब बागा जिवंत राहतील.
निसर्गाचा लहरीपणा, रोगट हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. यावर्षी मात्र खरिपाच्या पेरणीसाठी पावसाने ओढ दिल्याने पेरणी झालेल्या काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. मागच्या वर्षी अवकाळी पावसामुळे डाळिंब व मका पिकांचे नुकसान झाले. त्याचीही नुकसान भरपाई काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तसेच पंतप्रधान पीक योजनेनुसार शेतकरी बांधवांनी डाळिंब व मका पिकांचा विमा उतरविला होता. अद्याप शेतकरी बांधवांना विमा कंपनीकडून पीक विमा भरपाई मिळालेली नाही. मागील वर्षाची पीक विमा रक्कम तत्काळ मिळण्याची मागणी जीवन आहिरे, चेअरमन पाटणे विविध कार्यकारी सहकारी संस्था पाटणे, संचालक वसंतराव आहिरे, रत्नाकर निकम, विलास खैरनार, नितीन पगारे, प्रदीप शेवाळे यांनी केली आहे.
------------------
शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
यावर्षी वरुणराजाच्या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाला बसत आहे. पावसामुळे जणूकाही खरीप हंगामच धोक्यात आला आहे. पावसाची मृग व आर्द्रा ही महत्त्वाची नक्षत्रे कोरडीच गेली. काही ठिकाणी खरीप पिकाची पेरणीही पूर्ण झालेली नाही. ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली आहे तेही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाळ कांद्याचीही अवस्था वाईटच आहे. कांदा काढणीच्या वेळी बिगर मोसमी पावसामुळे कांदा खराब झाला. चाळीत साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांसमोर कांदा विक्री शिवाय पर्याय उरला नाही. शिवाय कांद्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत चालल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.