कुंभमेळ्यात गोदाप्रदूषण

By Admin | Updated: April 7, 2016 23:55 IST2016-04-07T23:29:07+5:302016-04-07T23:55:41+5:30

‘मंत्राज’चा अहवाल : धोक्याची पातळी ओलांडली

Pollution in Kumbh Mela | कुंभमेळ्यात गोदाप्रदूषण

कुंभमेळ्यात गोदाप्रदूषण

 नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये गोदावरीचे पात्र प्रदूषित झाले नाही, असा अहवाल राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सादर करण्यात आला होता; मात्र ‘मंत्राज’ या खासगी संस्थेनेही कुंभमेळ्याच्या कालावधीत गोदावरीच्या पाण्याचे नमुने तपासले होते. या अहवालानुसार गोदा प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याचा निष्कर्ष त्यात काढण्यात आला आहे. या अहवालाची प्रत सर्वच शासकीय कार्यालयीन प्रमुखांना सादर करण्यात येणार असल्याची माहितीही कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. उमेश शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये गोदापात्रात लाखो भाविकांनी स्नान करूनही गोदावरीचे जल प्रदूषण झाले नाही, असा अहवाल प्रदूषण मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला होता. सदर अहवाल सिंहस्थ कुंभमेळा झाल्यानंतर काही दिवसांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला होता. या अहवालानुसार कुंभमेळ्यात गोदावरी प्रदूषित झाली नाही, असा निष्कर्ष प्रदूषण मंडळाकडून काढण्यात आला होता. मंत्राज ग्रिन रिसोर्सेस या खासगी कंपनीच्या विशेष पथकाने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जल, ध्वनी आणि वायू प्रदूषणाची पडताळणी शहरात केली होती. गोदावरीच्या पाण्याची गुणवत्ता व दर्जा यांचे मूल्यमापन करण्यासाठी कंपनीच्या पथकाने चार ठिकाणांहून २४ पाण्याचे नमुने तपासले. १३ आॅगस्ट २०१५ ते ५ आॅक्टोबर २०१५ या कालावधीमध्ये गंगापूर धरण, अहल्यादेवी होळकर पूल, रामकूंड, तपोवन या चार ठिकाणांची जल प्रदूषणाचे नमुने तपासण्यासाठी निवड केली होती.
शास्त्रीय पद्धतीने शासकीय निकषानुसार पाण्याचे नमुने तपासण्यात आल्याची माहिती यावेळी अभियानाचे प्रमुख डॉ. एन. सी. कंकाल यांनी दिली आहे. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात मिसळत असून, त्याअनुषंगाने काही घातक रासायनिक द्रव्यही आढळून आल्याचे ते म्हणाले. नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्याच्या गटारी नदीपात्रात येणार नाही, याबाबत चोख उपाययोजना करणे गरजेचे असल्याचा निष्कर्ष संस्थेने काढला आहे.

Web Title: Pollution in Kumbh Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.