दोन प्रभागांसाठी २८ आॅगस्टला मतदान
By Admin | Updated: July 29, 2016 01:03 IST2016-07-29T00:55:34+5:302016-07-29T01:03:51+5:30
पोटनिवडणूक कार्यक्रम : आचारसंहिता लागू

दोन प्रभागांसाठी २८ आॅगस्टला मतदान
नाशिक : महापालिकेच्या नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक ३५ (ब) आणि प्रभाग क्रमांक ३६ (ब) मधील रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, सोमवार, दि. २८ आॅगस्ट २०१६ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. दोन्ही प्रभागांसाठी निवडणूक आचारसंहिताही मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नगरसेवकपद भूषविण्यासाठी आता किती इच्छुक पुढे येतील याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत नाशिकरोड विभागातील मनसेचे प्रभाग क्रमांक ३५ (ब)चे नगरसेवक शोभना संजय शिंदे आणि प्रभाग क्रमांक ३६ (ब)चे नगरसेवक नीलेश तुकाराम शेलार यांनी पक्षादेश डावलून मतदान केल्याने मनसेने दोन्ही नगरसेवकांविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे सदस्यत्वपद रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी दोन्ही नगरसेवकांना अपात्र घोषित केले होते. दरम्यान, दोन्ही अपात्र नगरसेवकांनी दि. ४ एप्रिल २०१६ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत न्यायालयाकडून कोणताही स्थगिती आदेश प्राप्त न झाल्याने अखेर पोटनिवडणुकीवर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या महिनाभरापासून महापालिकेमार्फत दोन्ही प्रभागांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राबविला जात होता. त्याबाबत प्राप्त हरकतींवर बुधवारी (दि.२७) सुनावणीही घेण्यात आली आणि गुरुवारी राज्य निवडणूक आयुक्तांनी दोन्ही प्रभागातील रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार, दि. २८ आॅगस्टला सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार असून, दि. २९ आॅगस्टला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी, दि. २ आॅगस्ट रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असून, दि. २ ते ९ आॅगस्ट या कालावधीत उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. रविवारी सुटीच्या दिवशी मात्र नामनिर्देशनपत्राची विक्री व स्वीकृती होणार नाही. दि. १० आॅगस्ट रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाईल. दि. १२ आॅगस्टपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. दि. १३ आॅगस्ट रोजी चिन्ह वाटप केले जाणार असून, आवश्यकता भासल्यास दि. २८ आॅगस्टला मतदान घेतले जाणार आहे. उमेदवारांना प्रचारासाठी पंधरा दिवसांचा कालावधी मिळणार आहे. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्याने राजकीय पक्षांमधील इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या असून, सहा महिन्यांसाठी मिळणाऱ्या नगरसेवकपदासाठी ही पोटनिवडणूक मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रंगीत तालीम म्हणूनही पाहिले जाणार आहे. (प्रतिनिधी)