दिंडोरी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 23:54 IST2016-01-09T23:37:52+5:302016-01-09T23:54:21+5:30
दिंडोरी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी आज मतदान

दिंडोरी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी आज मतदान
दिंडोरी : नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. १०) मतदान होत असून, पक्षीय उमेदवारांबरोबरच अनेक प्रभागात अपक्ष उमेदवारांनी शेवटपर्यंत किल्ला लढवत ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याने सर्वच लढती चुरशीच्या बनल्या आाहेत. कॉँग्रेस राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना, भाजपाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदार नेमके कुणाला साथ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दिंडोरी नगरपंचायतीच्या सतरा जागांसाठी ९१ उमेदवार रिंगणात असून, त्यात ५१ पक्षीय, तर ४० अपक्षांचा समावेश आहे. मावळत्या ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदिंचा यात समावेश असून, अनेक नवखे उमेदवारही रिंगणात आहेत. अनेक लढती भावकीत होत असल्याने रंगत वाढली आहे. शिवसेना सर्वाधिक १६ जागांवर लढत असून, एका प्रभागात अपक्षाला पुरस्कृत केले आहे. भाजपा १४ जागा लढत आहे, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करत अनुक्रमे दहा व सहा जागांवर लढत आहे. शिवसेनेतर्फे राज्यमंत्री दादा भुसे यांच्या सभा झाल्या, तर माजी आमदार धनराज महाले यांनी निवडणूक प्रतिष्ठेची करत प्रत्येक प्रभागात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. खासदार हेमंत गोडसे, निफाडचे आमदार अनिल कदम हेही प्रचारात उतरले आहेत. भाजपातर्फे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही प्रचारात उडी घेत भाजपाची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ, कॉँग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी एकत्रित सर्व प्रभागात मतदारांच्या गाठीभेटी घेत सत्ता देण्याचे आवाहन केले . कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनीही प्रचार शुभारंभ सभेत मतदारांना विकासासाठी संधी देण्याचे आवाहन केले. यासोबतच दिंडोरीतील सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आपापल्या पक्षाची सत्ता यावी, यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ, कॉँग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर, भाजपाचे नेते चंद्रकांत राजे, शिवाजीबाबा पिंगळ, शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले, बंडू शिंदे, रमेश बोरस्ते, मनसेचे मनोज ढिकले त्याचप्रमाणे माजी उपसरपंच विजय देशमुख, माजी सरपंच प्रमोद देशमुख, भाऊसाहेब बोरस्ते, दिलीप जाधव, शिवाजी जाधव, प्रीतम देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कैलास मवाळ, सतीश देशमुख, बाळासाहेब आंबेकर आदिंच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. (वार्ताहर)