नाशिक : कुंभमेळ्यात साधू-महंतांच्या मिरवणूक मार्गात काहीसा बदल करण्यावरून आता साधू-महंतांमध्येच राजकारण रंगले आहे. पालकमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीत नवीन मार्ग स्वीकारण्यास मूक संमती देणाऱ्या स्थानिक साधू-महंतांनी गेल्या आठवड्यात अचानक घूमजाव केले आणि पारंपरिकच शाहीमार्ग कायम ठेवावा, अशी मागणी केली. गेल्या आठवड्यातील या बदललेल्या भूमिकेसंदर्भात आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी संताप व्यक्त केला आहे आणि आता अगोदर घेतलेल्या मार्गात कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. कुंभमेळ्यातील पर्वणीच्या दिवशी पंचवटीतील तपोवनातून साधू- महंतांच्या आखाड्यांची मिरवणूक निघते. ही मिरवणूक रामकुंडाकडे जात असली तरी मध्ये अनेक ठिकाणी अरुंद मार्ग आहे. बारा वर्षांपूर्वी भरलेल्या कुंभमेळ्यात अशाच प्रकारे मिरवणूक सुरू असताना सरदार चौकात चेंगराचेंगरी झाली आणि त्यात २८ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पारंपरिक शाहीमार्गात काहीसा बदल न करता ती सरदार चौकाकडे न आणता गणेशवाडी भागातून गाडगे महाराज पुलाखाली मिरवणूक आणावी आणि तेथून थेट रामकुंडावर मिरवणूक न्यावी असा जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव होता. गेल्या महिन्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत साधू-महंतांची कुंभमेळ्यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी महंत ग्यानदास यांनी गणेशवाडीतून पर्यायी मार्ग नेण्यास तयारी दर्शविली होती. त्यामुळे सरदार चौकात रुंदीकरण न झाल्याने चिंतित असलेल्या जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु गेल्या शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मात्र स्थानिक महंतांनी अचानक घूमजाव केले. विशेषत: दिंगबर आखाड्यानेही नव्या शाहीमार्गास विरोध केला आणि पारंपरिक शाहीमार्गात बदल होणार नाही, असे निक्षूण सांगितले. आणि एकप्रकारे स्थानिक महंतांनी महंत ग्यानदास यांच्या विरोधात बंड पुकारल्याचे दिसत नाही.गेल्याच महिन्यात झालेल्या बैठकीत महंत ग्यानदास यांच्या भूमिकेविषयी चकार शब्द न काढणाऱ्या स्थानिक महंतांनी अशाप्रकारे घूमजाव केल्याने जिल्हा प्रशासन संभ्रमात पडले आहे, तर महंत ग्यानदास संतप्त झाले आहेत. स्थानिक पातळीवर भूमिका घेणाऱ्या उपमहंतांना अशाप्रकारे निर्णय घेण्याचा अधिकार नाही. मला त्यांनी सर्वाधिकार दिल्यानेच मी निर्णय घेतला असून, काहीही झाले तरी गणेशवाडीतील बदललेल्या मार्गावरूनच शाही मिरवणूक पार पडेल, असे त्यांनी निक्षूण सांगितले. (प्रतिनिधी)
साधू-महंतांमध्येच राजकारण रंगले
By admin | Updated: February 24, 2015 02:06 IST