कुलगुरूपदासाठी राजकीय हालचाली
By Admin | Updated: January 10, 2016 23:51 IST2016-01-10T23:49:53+5:302016-01-10T23:51:35+5:30
आरोग्य विद्यापीठ : उद्या जाहीर होणार यादी; राज्याबरोबरच केंद्रातूनही दबाव आणण्याचा प्रयत्न

कुलगुरूपदासाठी राजकीय हालचाली
नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुलगुरूपदासाठी प्राप्त अर्जांची छाननीप्रक्रिया शुक्रवारी पार पडल्यानंतर मंगळवार, दि. १२ रोजी अंतिम ११ उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, इच्छुकांनी राज्य, तसेच केंद्रातील मंत्र्यांचीदेखील मध्यस्थी वापरण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे समजते. कुलगुरूपदासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव वापरण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने काही इच्छुकांनी निवड समिती मेरीटऐवजी राजकीय वर्चस्वच ग्राह्य धरणार आहे का, असा सवालही उपस्थित केला आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी गेल्या शुक्रवारी अर्जांची छाननी करण्यात आली. कुलगुरूपदासाठी अर्ज केलेल्या सुमारे २६ अर्जांपैकी अंतिम ११ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून, मंगळवारी ही नावे जाहीर केली जाणार असल्याचे समजते. अर्ज दाखल केल्यापासून याप्रकरणी राजकीय दबाव दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा आहे. केवळ राज्यातूनच नव्हे तर दिल्ली दरबारीदेखील अनेकांनी धाव घेतल्याचे समजते. असे असले तरी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. मात्र आता या निवडप्रक्रियेत महसूलमंत्री एकनाथ खडसे, तसेच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीदेखील काही नावांसाठी प्रयत्न चालविले असल्याचे वृत्त आहे.
निवड समितीमध्ये आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे डॉ. निखिल टंडन, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट चंदीगढचे डॉ. योगेश चावला असल्याने या दोघांवर दिल्लीतून दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे बोलले जात आहे, तर राज्यातून मुख्यमंत्र्यांपासून इतर मंत्रीगणही कामाला लागल्याने एकूणच कुलगुरूपदासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कालपर्यंत जी नावे चर्चेत होती त्यामध्ये आणखी काही नावे पुन्हा चर्चेत आली आहेत. त्यामध्ये पुणे आणि मुंबईच्या दोन नावांची चर्चा आहे. यातील एक राज्यातील एका मंत्रीमहोदय यांचे नातेवाईक असल्याचे समजते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी, तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून काही इच्छुकांनी प्रयत्न चालविले आहेत. यातील दोन उमेदवार हे मंत्रीमहोद्वयांचे नातेवाईक असून, त्यांनी कुलगुरूपदासाठी राजकीय ताकदपणाला लावली आहे. तर कुलगुरूपदासाठी असलेली चुरस लक्षात घेता राजकीय मानापमान टाळण्यासाठी महिला उमेदवाराची निवड करण्यात यावी, असाही एक मतप्रवाह तयार झाला आहे. अर्थात याबाबतचे दररोज नवनवीन वृत्त समोर येत आहेत. (प्रतिनिधी)