राजकीय हालचाली गतिमान, इच्छुकांकडून चाचपणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 08:48 PM2021-08-29T20:48:01+5:302021-08-29T20:57:03+5:30

मनमाड : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, इच्छुकांनी राजकीय आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. मनमाड शहरात १५ प्रभागात ३१ वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.

Political movements accelerated, aspirants began to scrutinize | राजकीय हालचाली गतिमान, इच्छुकांकडून चाचपणी सुरू

राजकीय हालचाली गतिमान, इच्छुकांकडून चाचपणी सुरू

Next
ठळक मुद्देमनमाडकरांच्या पाचवीला पूजलेली पाणीटंचाई



खबरबात/मनमाड

गिरीश जोशी

मनमाड : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, इच्छुकांनी राजकीय आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. मनमाड शहरात १५ प्रभागात ३१ वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.

२०१६ साली झालेल्या पालिका निवडणुकीमध्ये मतदारांनी शिवसेनेच्या बाजूने कौल देऊन एकहाती सत्ता दिली होती. थेट नगराध्यक्षांसह २० जागांवर शिवसेना-रिपाइं युतीचे उमेदवार विजयी झाल्याने मनमाड पालिकेवर भगवा फडकला होता.या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपला एकही जागा न मिळता साफ धुव्वा उडाला तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने प्रत्येकी पाच जागा मिळवल्या होत्या. एक अपक्ष उमेदवारसुद्धा या निवडणुकीत विजयी झाला होता.या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या पद्मावती जगन्नाथ धात्रक यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दुसऱ्या तर भाजपच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. भाजपच्या प्रचारासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनमाड शहरात प्रचारसभा घेतली असली तरी नगरसेवक म्हणून एकही उमेदवार विजयी न झाल्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पालिकेच्या राजकारणात विरोधी पक्षाची भूमिका बजावत होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना कॉँग्रेस, राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. या निर्णयामुळे मनमाड पालिकेच्या राजकारणातील परिस्थिती बदलली गेली.राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांपैकी दोन जणांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान वंचित बहुजन आघाडीचा रस्ता धरला होता.

होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर आपापल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन खलबते सुरु केली आहे.आपल्या पक्षाची स्वबळावर निवडणूक लढण्यासाठीची पूर्ण तयारी झाली असली तरी सन्मानाची वागणूक मिळाल्यास समविचारी पक्षांशी युती करण्याची भाषा प्रत्येक पक्षाच्या बैठकांमधून करण्यात येत आहे. सध्याच्या विद्यमान नगरसेवकांबरोबरच इतरही नवीन उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक असून पक्षाकडून तिकीट मिळण्यासाठी फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.कोणत्या पक्षाची कोणत्या पक्षाबरोबर युती होईल वा आघाडी होईल या बाबत नागरिकांमध्ये चर्चा झडत आहे. या बाबतीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप, मनसे, शिवसेना, रिपाइंसह अन्य पक्षाचे नेते कामाला लागले आहेत.आपल्याला मानणारा कोण,पक्षाला मानणारा कोण याबाबत आकडेमोड सुरू झाली आहे.

करंजवन पाणीपुरवठा योजनेला चालना
मनमाड शहरात अंतर्गत रस्ते, गटारी, शौचालये यासह विविध विकासकामे विद्यमान सत्ताधारी गटाच्या कार्यकाळात करण्यात आली आहेत. मनमाडकरांच्या महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नाबाबत आग्रही भूमिका घेतल्याने शहरासाठीच्या करंजवन पाणीपुरवठा योजनेला चालना मिळाली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर मनमाडकरांच्या पाचवीला पूजलेली पाणीटंचाई संपुष्टात येणार आहे.

मनमाड शहरात विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली असल्याने शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.
- पद्मावती धात्रक, नगराध्यक्ष
गेल्यावेळी काँग्रेस पक्षाने स्वबळावर पालिका निवडणूक लढवली होती.या वर्षी पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल. स्वतंत्र निवडणूक लढविण्याची वेळ आली तरी त्या दृष्टीने तयारी सुरू आहे.
- अफजल शेख, शहराध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Political movements accelerated, aspirants began to scrutinize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.