लसीकरणावरून राजकीय सुंदोपसुंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST2021-07-28T04:15:55+5:302021-07-28T04:15:55+5:30
स्थायी समितीची साप्ताहिक बैठक मंगळवारी (दि. २७) सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी यासंदर्भात चर्चा करण्यात ...

लसीकरणावरून राजकीय सुंदोपसुंदी
स्थायी समितीची साप्ताहिक बैठक मंगळवारी (दि. २७) सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी यासंदर्भात चर्चा करण्यात आली. मुकेश शहाणे, समीना मेमन आणि राहुल दिवे यांनी लसीकरणाच्या विषयावरून प्रशासनाला धारेवर धरले. सिडकोत राजकीय स्पर्धेतून लोकप्रतिनिधी सांगतील त्यांना केंद्र सुरू करण्याची परवानगी प्रशासन देते. मुळात डाेस कमी येत असल्याने वैद्यकीय अधिकारी पक्षपातीपणा करून काहींना जास्त तर काहींना कमी डोस देत असल्याचा आरोप या वेळी मुकेश शहाणे यांनी केला. समीना मेमन यांनीही डाेस मिळत नसल्याने पहाटेपासून नंबर लावून असलेल्या नागरिकांना माघारी फिरावे लागते, अशी तक्रार केली. राहुल दिवे यांनी याच समस्येकडे लक्ष वेधताना केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा हाेत नसल्याचा आरोप केला.
केंद्र शासनाला देशातील सर्व राज्यांना लस पुरवावी लागते, त्यामुळे केंद्रावर दोष ठेवू नका, आपल्या महापालिकेचे सुयोग्य नियोजन नसल्याचे सभापती गीते यांनी सुनावले.
महापालिकेच्या वैद्यकीय उणिवांवर बोट ठेवताना समीना मेमन यांनी मुलतानपुरा रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली. तर महापालिकेत नवागत कर्मचाऱ्यांना थेट बिटको रुग्णालयात टाके टाकण्याची व अन्य कामे दिल्याचा आराेप केला.
इन्फो...
बिटकोत नवजात शिशू कक्ष
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी पूर्वतयारी म्हणून बिटको रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर नवजात शिशू कक्ष सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी ४६ लाख ४७ हजार रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली. ८० लाख रुपयांचे सर्जिकल साहित्य खरेदीचा प्रस्ताव मात्र तहकूब करण्यात आला.