राजकीय घराणी खालसा
By Admin | Updated: February 26, 2017 00:23 IST2017-02-26T00:23:16+5:302017-02-26T00:23:30+5:30
मातब्बर पराभूत : अनेक वारसदारांना फटका

राजकीय घराणी खालसा
नाशिक : शहराच्या राजकारणात दीर्घ काळापासून आपला दबदबा टिकवून ठेवणाऱ्या काही घराण्यांमधील वारसदारांना महापालिका निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. अनेक मातब्बरांना प्रतिस्पर्ध्यांनी धूळ चारल्याने संबंधित घराण्यांच्या राजकारणावरही त्याचे परिणाम दिसून येणार आहेत. महापालिका निवडणुकीत वर्षानुवर्षांपासून आपले अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या काही घराण्यांचे पुढचे वारसदारही पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरलेले होते. त्यात प्रामुख्याने, शहराचे प्रथम महापौर स्व. शांताराम बापू वावरे यांचे भाचे आणि माजी नगरसेवक श्रीमती निर्मलाताई कुटे यांचे सुपुत्र शैलेश कुटे यांना चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. कुटे यांना त्यांचे एकेकाळचे सहकारी कॉँग्रेसचे पण आता भाजपाकडून उमेदवारी करणाऱ्या शिवाजी गांगुर्डे यांनी पराभूत केले. मागील निवडणुकीत कुटे यांच्या भगिनी सुजाता डेरे यांनी मनसेकडून विजय मिळविला होता. यंदा त्यांनी बंधूसाठी निवडणूक लढविली नव्हती. माजी महापौर यतिन वाघ यांचा पराभव राष्ट्रवादीचे गजानन शेलार यांनी केला. यतिन वाघ यांचे वडील रघुनाथ वाघ हे भूतपूर्व नगरपालिकेत उपनगराध्यक्ष होते तर त्यांच्या आत्या सुमनताई बागले यांनी उपमहापौरपद भूषविले आहे. नाशिकरोड-देवळाली भागात दीर्घकाळ राजकारणात राहिलेल्या माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या दोन्ही कन्या तनुजा आणि नयना यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप हे विद्यमान आमदार आहेत, परंतु आपल्या दोन्ही मुलींना राजकीय वारसदार करू पाहणाऱ्या घोलपांना अपयश आले. उपनगर भागातून विजय ओहोळ व त्यांच्या पत्नी सुमन ओहोळ हे दाम्पत्य आलटून पालटून महापालिकेत निवडून येत आहे. यंदा मात्र विजय ओहोळ यांनी संधी घेतली, परंतु पक्षांतराचा फटका बसत त्यांना पराभवाची झळ पोहोचली. सिडकोत पाटील घराणेही दीर्घकाळापासून राजकारणात आहेत. केशवराव पाटील व दत्ता पाटील हे बंधू यापूर्वी महापालिकेत निवडून आले होते. यंदा केशवराव पाटील यांचे सुपुत्र राम पाटील यांनी उमेदवारी केली, परंतु त्यांनाही पराभव पत्करावा लागला. अनिल मटाले यांचीही तीच स्थिती बनली. माकपाचे तानाजी जायभावे व वसुधा कराड हे भाऊ-बहीणसुद्धा पराभूत झाले. यंदा महापालिकेत माकपचा सदस्य दिसणार नाही. त्याचबरोबर लक्ष्मण जायभावे यांनाही पराभवाचा धक्का बसला. शिक्षण सभापती संजय चव्हाण व त्यांच्या कन्या स्नेहल चव्हाण यांना मतदारांनी नाकारले. चव्हाण कुटुंबीय दीर्घ काळापासून राजकारणात आहेत.