स्त्रीभ्रूणहत्त्या रोखण्यासाठी धोरण हवे : विजयश्री चुंबळे
By Admin | Updated: February 27, 2015 00:09 IST2015-02-27T00:09:10+5:302015-02-27T00:09:21+5:30
महिला आरोग्य अभियान पंधरवडा शुभारंभ

स्त्रीभ्रूणहत्त्या रोखण्यासाठी धोरण हवे : विजयश्री चुंबळे
नाशिक : महिला आरोग्य पंधरवडा अभियानात आरोग्य शिबिराचा लाभ तळागाळातील ग्रामीण भागातील घटकांपर्यंत पोहचेल, अशी दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. तसेच स्त्रीभू्रणहत्त्या रोखण्यासाठी सोनोग्राफी केंद्रांवर लिंग चाचणी प्रतिबंध करण्याबाबत आरोग्य विभागाने कडक धोरण स्वीकारावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी केले.
शासनाच्या निर्णयानुसार २६ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान जागतिक महिला आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा ग्रामीण रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात महिला आरोग्य अभियान पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ काल (दि.२६) अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, कार्यक्रमाचे आयोजन हा फक्त देखावा न राहाता कृती व अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याबाबत आरोग्य विभागाने दक्षता घेणे आवश्यक आहे. स्त्रीभू्रणहत्त्या १०० टक्के प्रतिबंधीत होतील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांचेही मनोगत झाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी अभियानाची व्याप्ती सांगितली. ं
मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांत प्राथमिक आरोग्य केंद्रात या अभियानांतर्गत राबविण्याच्या बाबींचे दररोज नियोजन करण्याचे व तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे व डॉ. रवींद्र चौधरी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)