पोलीस ठाणे आता आॅनलाइन
By Admin | Updated: August 24, 2016 01:24 IST2016-08-24T01:23:55+5:302016-08-24T01:24:36+5:30
पोलीस आयुक्तालय : सर्व्हर कक्षाचा शुभारंभ

पोलीस ठाणे आता आॅनलाइन
नाशिक : पोलीस आयुक्तालयामध्ये सर्व्हर रूम व सिटी व्हिजिटर इन्फॉर्मेशन आणि नोंदणी व्यवस्थापन यंत्रणा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाचा शुभारंभ अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन यांनी सकाळी साडेअकरा वाजता केला. यावेळी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे, विजय पाटील आदि उपस्थित होते.
या यंत्रणेच्या माध्यमातून सर्व पोलीस ठाण्यांचे कामकाज संगणकीकृत यंत्रणेद्वारे जोडले गेले आहे. यामुळे दैनंदिन गुन्ह्यांची माहिती, चारित्र्य पडताळणी अर्ज, पासपोर्ट प्राप्ती अर्जाबाबत तत्काळ कार्यवाही करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना जलदगतीने कार्यालयीन कामे होण्यास मदत होणार आहे. याबरोबरच शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी ही संगणकीकृत आधुनिक यंत्रणा उपयोगी पडणार आहे. आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांच्या परिसरात असलेल्या विविध हॉटेल्स, लॉजमध्ये थांबणारे पर्यटक, तसेच भाडेकरुंची माहितीदेखील आयुक्तालयाला या सॉफ्टवेअरद्वारे मिळणार आहे.
संबंधित हॉटेल्स, लॉजमध्ये थांबलेल्या लोकांची यादी त्या भागातील पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना तत्काळ या सॉफ्टवेअरचा वापर करून बघता येणार आहे. तसेच ती माहिती आयुक्तालयालाही पुरविता येणार आहे. हॉटेल, लॉज चालकांकडून नोंदणी करण्यात आलेल्या नागरिकांची नावे संबंधित पोलिस ठाण्याला तत्काळ या यंत्रणेद्वारे समजण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)