पोलीस हल्ल्यातील संशयित ताब्यात : बीट मार्शलांची कामगिरी
By Admin | Updated: July 15, 2017 23:26 IST2017-07-15T23:26:34+5:302017-07-15T23:26:34+5:30
मुख्य संशयिताला बीट मार्शलाच्या जोडीने नवीन मध्यवर्ती बस स्थानकावरुन ताब्यात घेतले आहे.

पोलीस हल्ल्यातील संशयित ताब्यात : बीट मार्शलांची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुने नाशिकमधील दूधबाजारातून पायी गस्त घालत असताना हवालदार बाळू शंकर खरे यांच्यावर अज्ञात युवकाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गेल्या सोमवारी घडली होती. या घटनेतील मुख्य संशयिताला बीट मार्शलाच्या जोडीने नवीन मध्यवर्ती बस स्थानकावरुन ताब्यात घेतले आहे.
खरे यांच्यावरील हल्ला येथील एका हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासून संशयित हल्लेखोराचे वर्णनाचा बिनतारी संदेश सर्वत्र दिला होता. या संदेशावरुन वर्णन लक्षात ठेवत भद्रकाली पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस नाईक रमेश कोळी, हवालदार सुधीर चव्हाण यांनी नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या अनोळखी इसमास चौकशीसाठी ताब्यात घेतले. हल्ल्यामधील वर्णनानुसार पोलिसांना या इसमावर संशय आला. त्याला पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने हल्ल्याची क बुली दिली आहे. संशयित रमेश जनार्दन जाधव (२९, रा. रायगड ) यास अटक केली आहे. घटनेच्या पाच दिवसानंतरदेखील केवळ वर्णन लक्षात ठेवून संशयित हल्लेखोराला अटक केल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस प्रोत्साहनपर जाहीर केले आहे.
....म्हणून पोलिसावर हल्ला
रायगड जिल्ह्यातील तराणी गावामध्ये राहणाऱ्या जाधव याची एक तक्रारीची चौकशी रायगड पोलिसांनी पुर्ण केली नाही. त्यामुळे पोलीसांचा राग मनात धरून जाधव याने जुने नाशिकमधील खरे यांच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलीस तपासात प्रथमदर्शनी पुढे आल्याचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.