मद्यपीकडून पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण

By Admin | Updated: May 18, 2016 00:32 IST2016-05-17T23:57:37+5:302016-05-18T00:32:16+5:30

नांदूरशिंगोटे : पोलीस चौकीची तोडफोड करत धिंगाणा; आरोपीस अटक

Police Sub Inspector Drunken | मद्यपीकडून पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण

मद्यपीकडून पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण

नांदूरशिंगोटे : मी दिलेल्या तक्रारी अर्जाचे काय झाले? आरोपीला अटक का केली नाही, असा जाब विचारत दापूर येथील एका मद्यपीने नांदूरशिंगोटे पोलीस चौकीत अक्षरश: धिंगाणा घातला. पोलीस चौकीतील वस्तूंची मोडतोड करण्यासह उपनिरीक्षक मुख्तार सय्यद यांची नेमप्लेट तोडून त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रकार सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला.
दापूर येथील शिवाजी महादू आव्हाड हे रात्री ९ वाजेच्या सुमारास वावी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्रात गेले. आव्हाड यांची दुचाकी चौकीच्या पायऱ्यांजवळ रस्त्यात लावली. चौकीत पोलीस उपनिरीक्षक मुख्तार सय्यद व होमगार्ड आणि कामानिमित्त आलेल्या दोन-तीन व्यक्ती बसलेल्या होत्या. सय्यद यांनी दुचाकी रस्त्यातून बाजूला लावण्याची सूचना करताच आव्हाड भडकल्याचे पोलिसांनी सांगितले. आव्हाड यांनी मोठमोठ्याने बोलून मी दिलेल्या तक्रार अर्जाचे काय केले, आरोपीला अटक करा, असे म्हणून हुज्जत घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तुम्ही येथे कशाला बसले असे म्हणत त्यांनी उपनिरीक्षक सय्यद यांची नेमप्लेट तोडून त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस चौकीत असलेले अ‍ॅड. संजय सोनवणे, राजेंद्र शिंदे यांनी आव्हाड यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करताच त्यांनी शिंदे यांना चप्पलने मारहाण केली. आव्हाड यांनी चौकीतील आरसा व खुर्चीची मोडतोड करीत साहित्य अस्ताव्यस्त फेकले. याप्रकरणी उपनिरीक्षक सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी शिवाजी आव्हाड याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ व मारहाण करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी संशयित आरोपी आव्हाड यास अटक करून त्याची वैद्यकीय तपासणी केली. आव्हाड हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक निरीक्षक रणजीत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Police Sub Inspector Drunken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.