पोलीस ठाण्यातून आरोपीचा पोबारा
By Admin | Updated: May 16, 2017 00:40 IST2017-05-16T00:39:59+5:302017-05-16T00:40:19+5:30
नाशिक : तालुका पोलीस ठाण्यातून घरफोडी व दरोडाप्रकरणी अटकेत असलेला संभाजी विलास कवळे याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पोबारा केला.

पोलीस ठाण्यातून आरोपीचा पोबारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : तालुका पोलीस ठाण्यातून घरफोडी व दरोडाप्रकरणी अटकेत असलेला संभाजी विलास कवळे याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पोबारा केला. कवळेला शहर पोलिसांनी गेल्या आठवड्यात पेट्रोलपंपावरील दरोडाप्रकरणी अटक केल्यानंतर त्याची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली होती.
कवळेला सकाळी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर सकाळी ११.५ मिनिटांनी ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेत नाशिक तालुका पोलीस ठाण्यात आणले. मात्र येथे आरोपींना ठेवण्यासाठी कोठडीची व्यवस्था नसल्याने कवळेला पोलीस ठाण्यातच बसविण्यात आले.
मात्र यावेळी पोलिसांचे कवळेकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांनी या संधीचा फायदा घेऊन पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पोबारा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी कवळेला मातोरी येथील मोहिते यांच्या घरी दरोडा घातल्याप्रकरणी चौकशीसाठी ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (दि.१५) ताब्यात घेतले होते. संध्याकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास पोलिसांचे आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून कवळेने हातातील बेडी हळूहळू काढण्याचा प्रयत्न केला.
हातातून बेडी निघाल्यांतर त्याने पोलीस ठाण्याच्या पूर्वेला असलेल्या ठेंगण्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले. ही घटना पोलिसांच्या दोन तीन मिनिटांनी लक्षात आली. तोपर्यंत कवळे पोलीस ठाण्याच्या परिसरातून निसटल्याने पाठलाग करूनही त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले. पोलीस त्याच्या मागावर असून, लवकरच कवळेला पकडण्यात यश येईल, असे पोलिसांनी सांगितले.