हाणामारी करणाऱ्यांकडून पोलिसांना धक्काबुक्की
By Admin | Updated: March 13, 2017 23:30 IST2017-03-13T23:29:45+5:302017-03-13T23:30:06+5:30
नाशिक : तिडके कॉलनी परिसरात होळीचा सण साजरा होत असताना दोघा तरुणांनी आपापसात भांडण करून एकमेकांना मारण्यास सुरुवात केली.

हाणामारी करणाऱ्यांकडून पोलिसांना धक्काबुक्की
होळीचा वाद : दोघांविरोधात गुन्हा दाखल नाशिक : तिडके कॉलनी परिसरात होळीचा सण साजरा होत असताना दोघा तरुणांनी आपापसात भांडण करून एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. या हाणामारीचे पर्यवसान मोठ्या घटनेत होऊ नये, यासाठी हस्तक्षेप करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना या तरुणांनी धक्काबुक्की केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सणासुदीला तिडके कॉलनी परिसरात भांडण करत दहशत माजविण्याचा प्रयत्न करत असल्याची घटना मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक शिंदे व कर्मचारी यांना कळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी भांडण करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांनी केला असता संशयित जालिंदर गिडगे (२७, आडगाव), योगेश पाटील (२३, तिडके कॉलनी) यांनी त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून बाजूला लोटण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘पोलीस माझे काहीही करू शकत नाही’ असा दम भरला. पोलीस शिपाई सचिन करंजे यांच्या फिर्यादीवरून दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास शिंदे करीत आहेत. पोलीसांना अरेरावी करण्याचे प्रकार काही महिन्यांपुर्वी शहरात घडले होते. त्यावेळी पोलीस आयुक्तांनी पोलीसांच्या संरक्षणाची हमी घेतली होती, मात्र असे प्रकार अजूनही सुरूच आहेत. (प्रतिनिधी)