पोलीस अधिकाऱ्यांना कार्यस्थळीच प्रशिक्षण

By Admin | Updated: August 12, 2016 23:45 IST2016-08-12T23:44:38+5:302016-08-12T23:45:38+5:30

व्यंकटेशम : पोलीस अकादमीमध्ये देशातील प्रशिक्षणासाठीचा पहिला ई-स्टुडिओ

Police officers at the workplace training | पोलीस अधिकाऱ्यांना कार्यस्थळीच प्रशिक्षण

पोलीस अधिकाऱ्यांना कार्यस्थळीच प्रशिक्षण

 नाशिक : महाराष्ट्र पोलीस अकादमीतील अत्याधुनिक ‘ई-एमपीए स्टुडिओ’द्वारे आता राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यस्थळीच अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध झाली असून, यामुळे अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणावर होणारा खर्च व वेळ यांची बचत होणार आहे़ सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी एकाच वेळी वापरला जाणारा हा देशातील पहिलाच स्टुडिओ असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) डॉ़ के. व्यंकटेशम यांनी एमपीएमध्ये बुधवारी (दि़ १०) झालेल्या स्टुडिओच्या उद्घाटनप्रसंगी दिली़
गुन्हेगार हे टेक्नोसॅव्ही झाले असून, त्यानुसार पोलिसांनाही आपला तपास तसेच कार्यपद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे़ त्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या महाराष्ट्र पोलीस अकादमीने आपल्या अभ्यासक्रमामध्ये तसे बदलही केले आहेत़ प्रशिक्षण कालावधीनंतर बाहेर पडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना निरंतन प्रशिक्षणाची आवश्यकता असते; मात्र गुन्ह्यांचा तपास, बंदोबस्त आदि कारणांमुळे इच्छा असूनही त्यांना प्रशिक्षण घेता येत नाही़
राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या कार्यस्थळीच प्रशिक्षण घेता यावे यासाठी राज्य सरकारच्या निर्णयानुसार एमपीएमध्ये ई-अकादमी कार्यान्वित करण्यात आली आहे़ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करून आॅनलाइन प्रणालीद्वारे ई-एमपीए स्टुडिओतून प्रायोगिक स्तरावर प्रशिक्षण वर्गही सुरू करण्यात आले आहे़ याद्वारे राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये, परिक्षेत्रे, जिल्हे व पोलीस प्रशिक्षण केंद्र जोडले गेले आहेत़
महाराष्ट्र पोलीस अकादमीतील या अत्याधुनिक स्टुडिओ, प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी ५० लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेले अद्ययावत फिटनेस सेंटर तसेच ६० लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रॅपलिंग व क्लायबिंग वॉलचे उद्घाटन व्यंकटेशम यांच्या हस्ते झाले़ यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक नवल बजाज आदिंसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Police officers at the workplace training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.