पोलीस कर्मचाऱ्याला चोरट्यांचा हिसका
By Admin | Updated: March 22, 2015 00:44 IST2015-03-22T00:44:19+5:302015-03-22T00:44:19+5:30
गाफील यंत्रणा : घरफोडीत पिस्तुलासह जिवंत काडतुसांची चोरी

पोलीस कर्मचाऱ्याला चोरट्यांचा हिसका
नाशिक : ऐरवी सामान्य नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या घरफोड्यांची मजल आता पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचली असून, आडगाव शिवारातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सरकारी पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसे चोरून नेल्याची घटना घडली आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, आडगाव परिसरातील वृंदावननगरमध्ये शिवाजी आव्हाड यांचे साईकृपा रो-हाऊस आहे़ बुधवारी (दि़१८) सायंकाळी साडेसात ते गुरुवारी (दि़१९) सकाळी सात वाजेच्या दरम्यान आव्हाड हे कामानिमित्त बाहेर गेले होते़ यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील ९ एमएम अॅटो पिस्टल (बट नं़ सीपीएन १२३, बॉडी नंबर १६०९९२१५), पाच जिवंत काडतुसे व घरातील एलईडी टीव्ही असा ७३ हजार ३४१ रुपयांचा ऐवज चोरून नेला़
या प्रकरणी पोलीस कर्मचारी अशोक आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, चोरटे आता पोलीस कर्मचाऱ्यांची दारापर्यंत पोहोचून पोलिसांना एकप्रकारे आव्हान देत असल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे़ (प्रतिनिधी)