पोलीस यंत्रणेची उडाली तारांबळ
By Admin | Updated: October 10, 2016 02:23 IST2016-10-10T02:23:01+5:302016-10-10T02:23:52+5:30
बंदोबस्त : स्ट्राइकिंग फोर्स, शीघ्र कृतिदल तैनात

पोलीस यंत्रणेची उडाली तारांबळ
नाशिक : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या तळेगाव येथील घटनेचे पडसाद उमटल्यानंतर पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. शनिवारपासून निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती रविवारी सकाळी चिघळली. सर्वात अगोदर द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन आणि त्यानंतर संपूर्ण शहरात टप्प्याटप्याने आंदोलन झाल्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चांगलीच धावाधाव करावी लागली.
एका ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोच दुसऱ्या ठिकाणी दगडफेक, जाळपोळ आणि रास्ता रोको आंदोलन झाल्याची खबर येऊन धडकत असल्याने पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी कसरतच करावी लागली. शहरात सर्वत्र तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याने आणि सोशल नेटवर्किंग साइटवर अफवा पसरविणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात काही अंशी पोलिसांना यश आले. पालकमंत्री, माजी मंत्री एकनाथ खडसे, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह नाशिकमध्ये आल्याने त्यांची सुरक्षितता तसेच सातत्याने शहरात कुठे ना कुठे आंदोलन होत असल्याने या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य पोलिसांना पार पाडावे लागले. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सायंकाळी काही संघटनांनी मोर्चा काढल्याने आणि वाहनांवर दगडफेक होऊ लागल्याने बंदोबस्ताचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. विशेषत: अनेकदा दंगल पेटल्याची अफवा पसरल्यानेही पोलिसांची धावाधाव झाली. बसेसवर दगडफेक करून पळणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यातही पोलिसांनी तत्परता दाखविली. (प्रतिनिधी)