झारखंडच्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
By Admin | Updated: September 12, 2016 01:11 IST2016-09-12T01:10:38+5:302016-09-12T01:11:06+5:30
आॅनलाइन फसवणूक : बँकेतून बोलत असल्याचे सांगत घेतली माहिती

झारखंडच्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
नाशिक : बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँक खात्याबाबत माहिती घेऊन खात्यातील रक्कम आॅनलाइन पद्धतीने काढून फसवणूक करणाऱ्या झारखंडमधील टोळीचा नाशिक पोलिसांनी झारखंड पोलिसांच्या मदतीने पर्दाफाश केला आहे़ या टोळीतील नारायण सुकदेव मंडल व रोहित सुकदेव मंडल या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडे विविध बँकांचे बनावट पासबुक, एटीम व कागदपत्रे आढळून आली आहेत़ या अटक केलेल्या संशयितांना घेऊन पोलीस सोमवारी शहरात पोहोचणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँक खात्याची माहिती घेऊन आॅनलाइन पद्धतीने पैसे काढून घेण्याच्या प्रकारांत वाढ झाली होती़ अशाच प्रकारचा एक गुन्हा ४ जुलै रोजी नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील चेहेडी शिव परिसरात घडला होता़ अजय शिवशंकर गुप्ता यांच्या बँक खात्यातून सुमारे पन्नास हजार रुपयांची रक्कम या भामट्यांनी आॅनलाइन पद्धतीने काढून घेतली होती़ पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांना तपास करण्याचे आदेश दिले होते़
निरीक्षक अनिल पवार यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर गुप्ता यांच्या खात्यातील रक्कम ही झारखंड राज्यातील मारगोडीह येथे वर्ग झाल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंगेश मजघर, किशोर खिल्लारे, भूषण चंदेल या तिघांचे एक पथक झारखंडला पाठविण्यात आले़ या पथकाने मारगोडीह गावात अहिल्यापूर पोलिसांच्या मदतीने संशयित मंडल याच्या घरावर छापा टाकला़ या ठिकाणी त्यांना ५ लाख १० हजार रुपयांची रक्कम तसेच बँकांचे बनावट पासबुक, लॅपटॉप, चेकबुक, विविध बँकांचे एटीम आढळून आले़
या टोळीकडून अनेक राज्यांतील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वतृविली आहे़ दरम्यान, नाशिक पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे़ (प्रतिनिधी)